वेलकम सुनिल... कपिलची ‘गुत्थी’ सुटली!, i`ll be happy to have sunil grover back on my show kapil shar

वेलकम सुनिल... कपिलची ‘गुत्थी’ सुटली!

वेलकम सुनिल... कपिलची ‘गुत्थी’ सुटली!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

हास्य कलाकार कपिल शर्मा याच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा त्याचा एकेकाळचा सहकलाकार सुनिल ग्रोवर यानं बोलून दाखवलीय... ही माहिती खुद्द कपिलनंच दिलीय.

सुनिल ग्रोवर यानं ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ मध्ये पुन्हा परतण्याविषयी कपिलला विचारलंय... आणि यामुळे कपिलचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आपल्या शो मध्ये पुन्हा एकदा ‘गुत्थी’चं स्वागत करण्यासाठी कपिल उत्सुक आहे.

कपिलच्या कार्यक्रमात त्याच्या शेजारी राहणाऱ्या ‘गुत्थी’चं कॅरेक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय ठरलं होतं. याचसंदर्भात सुनिलनं कपिलची नुकतीच भेट घेतलीय. कपिल आपल्या एका मित्रासोबत एका हॉटेलमध्ये गेला असताना त्याची अचानक सुनीलशी भेट झाली. थोड्या फार मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर सुनिलनं आपल्याला या कार्यक्रमात परतायला आवडेल असं म्हटलं.

‘सुनिलची ही इच्छा आपण चॅनलपर्यंत पोहचवली आहे.... आता पुढच्या सर्व बाबी या सुनिल आणि चॅनलमध्ये होतील... माझं म्हणाल तर मी सुनिलला पुन्हा एकदा कार्यक्रमात पाहण्यासाठी खूप खुश आहे. कार्यक्रमातील महत्त्वाच्या अंगांपैकी तो एक आहे’ असं कपिलनं म्हटलंय.

कीकू शारदा, अली असगर, उपासना सिंह, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्ती यांनी कार्यक्रमाला पुढे नेलंय. सुनीलनं वेगळा मार्ग निवडला होता पण आता त्याला या कार्यक्रमात परतण्याची इच्छा असेल तर त्याचं स्वागतच आहे, असं म्हणत कपिलनं आपला आनंद व्यक्त केला.

कपिलच्या कार्यक्रमातून बाहेर पडून सुनिलनं दुसऱ्याच एका चॅनलवर आपला ‘मॅड इन इंडिया’ हा कार्यक्रम लॉन्च केला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला काही दिसत नाहीए.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 18:10


comments powered by Disqus