Last Updated: Wednesday, April 24, 2013, 15:00
www.24taas.com, मुंबईमनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते. मराठीतील अनेक कलाकार हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेत आहेत. तर दुसरीकडे आता मनसेही पुढे सरसावली आहे. मनसेतही मराठी कलाकारांची फौज उभी राहते आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात `स्टार वॉर` सुरू झालं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या कलाकारांनी आज मनसेत प्रवेश केला. यात अभिनेत्री रीमा लागू, आसावरी जोशी, सुहास जोशी, पुरुषोत्तम बेर्डे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांनी शिवसेना चित्रपट सेनेची धुरा हातात घेतल्यानंतर शरद पोंक्षे, दिगंबर नाईक, सुबोध भावे यांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केला होता.
मराठी आणि बॉलिवूड कलाकारांना पक्षात घेण्यासाठी दोन्ही पक्षांत नेहमीच स्पर्धा असते, ती आता निवडणुकीच्या तोडांवर वाढली आहे. बांदेकर यांच्या चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर गिरीश ओक यांना त्यांनी रामगोपाल वर्मा प्रकरणी न्याय मिळवून देला होता. त्याला शह धक्का देण्यासाठी मनसेचं हे पाऊल मानण्यात येतं आहे.
First Published: Wednesday, April 24, 2013, 15:00