Last Updated: Tuesday, April 16, 2013, 15:38
www.24taas.com, नवी दिल्ली अभिनेता संजय दत्त याने शिक्षा भोगण्यासाठी शरण यायला अवधी मिळावा यासाठी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी आज होणार होती. ती टळली. आता या याचिकेवर उद्या (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आलीय. बॉम्बस्फोट प्रकरणात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयला न्यायालयाने १८ एप्रिलला न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते.
दरम्यान, संजयने सोमवारी शरण येण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदत मिळावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. यावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे संजयबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी माफीबाबत निर्णय घेईपर्यंत शिक्षा स्थगित करावी, असा अर्ज या प्रकरणातील आणखी एक दोषी झैबुनिसा काझी यांनी केला होता. पण, त्यांचा आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर संजय दत्त यानेही अर्ज केला आहे.
First Published: Tuesday, April 16, 2013, 15:38