शाहरूखची उतरली गुर्मी, मागितली माफी - Marathi News 24taas.com

शाहरूखची उतरली गुर्मी, मागितली माफी

www.24taas.com, जयपूर
 
कोलकता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आज शनिवारी माफी मागितली. तो एवढ्यावर न थांबता दंड भरण्याची तयारी दर्शविली आहे.  सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल  राजस्थान पोलिसांनी शाहरुखविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
 
राजस्थानमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. ८ एप्रिल रोजी कोलकता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान झालेल्या सामन्यात शाहरुख खानने धूम्रपान  केले होते. शाहरुख  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना दिसल्याने जयपूर येथील रहिवासी अनंतसिंह राठोड यांनी सत्र न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २८ एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने शाहरुखला नोटीस बजावली होती.
 
शाहरूखला २६ मेपूर्वी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर २१  जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता शाहरुखने माफी मागून दंड भरण्याची तयारी दर्शविल्याने न्यायालयासमोर हजर होण्याची गरज राहणार नाही.
 
दरम्यान,  मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी माफी मागण्यास शाहरुखने नकार दिला होता. परंतु, धूम्रपानाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने नरमाईची भूमिका घेत शाहरुखने माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

First Published: Saturday, May 26, 2012, 17:57


comments powered by Disqus