डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचं वादळ, Narendra Dabholkar killed in pune

डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचं वादळ

डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचं वादळ
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रात समानार्थी शब्द बनलेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी त्यांनी हयातभर `साधना` केली. पुरोगामित्वाचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात त्यांची हत्या व्हावी, यासारखं दुसरं दुर्दैव ते कोणतं..?

ज्येष्ठ समाजसुधारक आणि अंनिसचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात खून झाला. दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मंगळवारी सकाळी सकाळी या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. दाभोलकर यांच्या खुनामागे कोण.... या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे अर्ध्वयु आणि समाजसुधारणेच्या प्रवाहातलं मोठं नाव म्हणजे डॉ.नरेंद्र दाभोलकर. दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आक्रोशातून दाभोलकरांचा विचारांचा ठामपणा दर्शवला.

अखेरपर्यंत झुंजत राहणे आणि झुंजताना संयम राखणे, ही शिकवण डॉ. नरेंद्र दाभोलकरांना दिली ती कबड्डीने. दाभोलकर हे विद्यार्थी दशेत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा संमत व्हावा, यासाठी गेली १८ वर्षे ते लढत होते. या लढ्यातली त्यांची चिकाटी त्यांच्यातील कबड्डीपटूची साक्ष देत होती.

साता-यात जन्मलेल्या दाभोलकरांचा मूळ पिंड हा अस्सल कार्यकर्त्याचा होता. `कुछ बनो...` या जयप्रकाश नारायण यांच्या शब्दांनी त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत झाला... राष्ट्र सेवा दलात काम करताना त्यांच्या सत्यशोधक व चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळाली. केरळचे रॅशनलिस्ट नेते बी. प्रेमानंद, युक्रांदचे नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याकडून त्यांनी सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली. एमबीबीएस झाल्यावर वैद्यकीय सेवेच्या पहिल्या चार महिन्यातच सातारा नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरूद्ध त्यांनी आंदोलन केलं. 1977 साली सरकारी नोकरांचा संप झाला. राजपत्रित अधिकारी असूनही भाषण केल्यानं त्यांची नोकरी गेली. आणि त्यानंतरच त्यांचा जन्म झाला.

समाजातील कालबाह्य रूढी-परंपरा, अंधश्रद्धा यांनी त्यांना अस्वस्थ केलं. 1983 साली शाम मानव यांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीत ते सामील झाले. पण 1989 मध्ये शाम मानव यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. केवळ चळवळी न करता, समाजप्रबोधनाच्या हेतूने दाभोलकरांनी अनेक पुस्तके लिहिली. चळवळीचे काम करताना काही चुका झाल्यास त्या प्रांजळपणे मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. सोपी मांडणी, अनेक उदाहरणांसह विषय समजावण्याची हातोटी, विचारांची ठाम व आग्रहपूर्वक मांडणी, मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या लिखाणाची शैली होती.

सानेगुरूजींनी सुरू केलेल्या आणि ग. प्र. प्रधान मास्तरांचा वारसा जपणा-या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 2006 सालापासून संपादक होते. विनय, नम्रता आणि साधेपणा हे त्यांचे गुण सानेगुरूजींशी साधर्म्य सांगणारे होते. समाजात विज्ञाननिष्ठा वाढीला लागावी म्हणून त्यांनी सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प सुरू केला. त्याशिवाय त्यांनी जातपात निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्रेही सुरू केली. एक गाव, एक पाणवठाच्या माध्यमातून त्यांनी दलित चळवळही हाती घेतली. महाराष्ट्रातील विविध यात्रा आणि ऊरूसांमध्ये बोकडांचा बळी देण्याची प्रथा बंद करण्यात त्यांनी थोडाफार हातभार लावला.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात जे कुणी आडवे आले, त्यांच्यावर सनदशीर मार्गाने दाभोलकरांनी जोरदार प्रहार केले. हात फिरवून हवेतून सोनसाखळ्या काढणारे सत्यसाईबाबा, चाकूरमध्ये अतिभव्य साईबाबा मंदिर उभारणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, नरेंद्र महाराज, अस्लम ब्रेडवाला, निर्मलादेवी ही त्यातली ठळक उदाहरणे.

पत्नी हौसा याही त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात समरस झालेल्या होत्या. त्यांनी आपल्या मुलांची नावे मुक्ता आणि हमीद अशी ठेवली. त्यांच्यात मुरलेल्या चळवळीचाच हा परिपाक मानला जातो. दाभोळकरांचे आयुष्य हेच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ बनले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रात संमत व्हावा, यासाठी त्यांनी चळवळ सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे देव-धर्मविरोधी म्हणून संशयाने पाहिले जाऊ लागले. पण त्याही परिस्थितीत विवेकनिष्ठ दृष्टिकोनाचा झेंडा खांद्यावर घेत, ही चळवळ जनमानसात रूजवण्याचे काम दाभोलकरांनी केले...त्यासाठीची त्यांची साधना अजून संपलेली नव्हती. पण हा कायदा संमत होण्यापूर्वीच दाभोलकरांची हत्या झाली. एका सेवाभावी पर्वाची अखेर झाली... आता हा कायदा संमत करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. परिवर्तनवादी चळवळीच्या या शिलेदाराला झी मीडियाचा सलाम.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, August 21, 2013, 11:22


comments powered by Disqus