Last Updated: Saturday, May 25, 2013, 12:25
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
श्रीनिवासन यांनी स्वच्छेने राजीनामा दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले. दरम्यान, श्रीनिवासन यांच्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची नावे चर्चेत आहेत.
बीसीसीआयमधील एका गटाने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्यांची गच्छंती होणार हे अटळ मानण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे. श्रीनिवासन हे कोलकता दौरा रद्द करून गुरूनाथ यांची भेट घेण्यासाठी मुंबईला आलेत.
रविवारी होणाऱ्या आयपीएलमधील अंतिम सामन्यानंतर बीसीसीआय सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत श्रीनिवासन यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जगभरात सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या बीसीसीआयची श्रीनिवासन यांच्यामुळे प्रतिमा खराब होत असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले आणि आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनीही या प्रकरणी श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 25, 2013, 12:25