Last Updated: Saturday, September 14, 2013, 16:23
www.24taas.com
सुनील घुमे, झी मीडिया गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला...
पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...
राजाच्या मंडपापासून जवळपास दीड किमी अंतरावर आमची बिल्डिंग आहे. साधारणपणे गणेशोत्सवाच्या दुस-या किंवा तिस-या दिवशी ही नवसाची रांग बिल्डिंगपर्यंत पोहोचते. पण यंदा गणेश चतुर्थीच्या आदल्याच दिवशी गं. द. आंबेकर मार्गावर राजाच्या भक्तांची नवसाची रांग अॅनाकोंडाच्या शेपटासारखी पसरली होती...
आता याला श्रद्धा म्हणायची की, अंधश्रद्धा..?
कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेशाचे नाव घेऊन करावी, ही झाली श्रद्धा...
पण नवसाला पावतो म्हणून `लालबागचा राजा`च्या रांगेत, 10-15 तास तिष्ठत उभं राहायचं, ही अंधश्रद्धाच झाली...
गणपती म्हणजे गणपती... मग तो लालबागचा राजा असो, गणेशगल्लीचा असो, सिद्धीविनायक असो, नाही तर घराजवळच्या छोट्याशा मंदिरातला असो... देवापुढे नमस्कार करावा, हात जोडावेत, अगदी नतमस्तक व्हावे, इथपर्यंत ठिक आहे. पण देवाकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी तासन् तास असं रांगेत उभं राहणं, याला भोळेपणा नाहीतर दुसरं काय म्हणायचं..?
आश्चर्याची बाब म्हणजे अगदी तान्हुल्या बाळांसह, लहानग्या कच्च्यांबच्चांसह कुटुंबंच्या कुटुंब रांगेत उभी होती. त्यात तरूण-तरूणींची संख्याही लक्षणीय होती. सध्याची तरूण पिढी वाया गेलीय, अशी सार्वत्रिक ओरड केली जाते. त्यामुळे रांगेतली तरूण-तरूणींची संख्या पाहून कुणाला तरी पोरं सुधारतायत, असं वाटू शकेल. पण मला वाटतं की, ही उलट जास्त चिंतेची बाब आहे. `लालबागचा राजा`पुढं नवस केला, तर तो पावतो, ही त्यांची मानसिकता फारच चिंताजनक आहे. `प्रयत्नार्थी परमेश्वर,` असं म्हटलं जातं. पण ही यंग जनरेशन प्रयत्नांची कास सोडून, तासन् तास नवसाच्या रांगेत उभं राहत असेल तर नक्कीच काहीतरी `केमिकल लोचा` आहे...
मी नास्तिक वगैरे नाही... देव नावाची संकल्पना मला देखील मान्य आहे. पण देव एखाद्या विशिष्ट मूर्तीमध्ये किंवा मंदिरामध्येच राहतो, यावर माझा तरी विश्वास नाही. देव हा चराचरात व्यापलेला आहे. निसर्गात आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसातही आहे... मग नवसाच्या रांगेत उभं राहण्याची गरजच काय? मी डोळे मिटले, मनोभावे हात जोडले की माझा नमस्कार देवापर्यंत पोहचायलाच हवा... त्यासाठी प्रसाद, पेढे, हारतुरे, नारळ यांची गरजच काय? एखादं काम व्हावं, म्हणून प्रयत्न करायचे सोडून नवसाच्या रांगेत उभं राहायचं... केवळ नवस करायचा नाही, तर तो पूर्ण झाला तर अमूकतमूक किलो लाडू-पेढे वाहिन, अशी लालूच थेट देवाला दाखवायची... म्हणजे फारच झालं. देवाच्या दरबारात म्हणजे मंदिरात जायचं तर पवित्र मनाने आणि शरीराने जायचं... स्वच्छ स्नान करून देवापुढे प्रसन्न मनानं जायचं असतं... असे संस्कार आपल्यावर असतात. पण नवसाच्या रांगेत 10-15 तास उभे राहणारे, गर्दीत धक्केबुक्के खाणारे, टेम्पररी प्रसाधनगृहांमध्ये शी-सू करणारे, रात्रभर रांगेत पेंगा काढणारे हे `नवसाच्या रांगेतले भाविक` आंघोळ वगैरे न करताच लालबागचा राजाच्या चरणी मस्तक कसे ठेवू शकतात, याचेही राहून राहून आश्चर्य वाटते.
मला आठवतं, लहान असताना आम्ही मार्केटचा राजा पाहायला जायचो... तेव्हा मार्केटचा राजा अशीच त्याची ओळख होती, तो `लालबागचा राजा` झालेला नव्हता... अगदी दहा-पंधरा मिनिटांत त्याचं दर्शन व्हायचं... मार्केटमधली व्यापारी मंडळी तेव्हा भक्तांना निरमाच्या छोट्या पॅकेटमधल्या पावडरी वाटायचे... जाहिरातीसाठी. फुकट सरबत पाजायचे. जाहिरातीसाठी. आणि तिथून मग गरमखाड्यातली जत्रा पाहण्यासाठी आम्ही जायचो... तिथं एक रूपया टाकला की, सोंडेतून एक मोठा कडक बुंदीचा लाडू देणारा गणपती असायचा... खेळणी असायची, खाऊची दुकानं असायची, थम्स अप-कोल्याचे स्टॉल असायचे... पण या नवसवाल्यांच्या आणि मंडळवाल्यांच्या कृपेने गेल्या काही वर्षांत ती सगळी गम्मतच हरवून गेली. हल्ली नवसवाले भाविक जसे वेगळे, तसे मुखदर्शनवाले भाविकही वेगळे झालेत. गरमखाड्याच्या मैदानात आता जत्रा भरत नाही, तिथं भाविकांच्या रांगांची गोलगोल वेटोळी केलेली असतात. गेल्या पाच-सहा वर्षांत मी तरी या गर्दीच्या जंजाळात गेलेलो नाही, पण इथं म्हणे एसीच्या एसी लावलेले असतात. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून कूलर असतात. रात्रभर रांगेत उभे असणा-यांना चहापानाची आणि मोफत अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते.
चांगभलं... मार्केटचा राजा आता मार्केटिंगचा राजा झालाय तर...
नवसाची रांग, मुखदर्शनाची रांग... तशी आणखी एक रांग हल्ली इथं दिवसरात्र ओसंडून वाहत असते... सेलिब्रिटींची रांग !!!
`लालबागचा राजा`च्या दर्शनासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींची रीघच लागलेली असते. कुणी म्हणतं की, या व्हीव्हीआयपींना मंडळवालेच निमंत्रण पाठवून बोलवतात... कुणी सांगतं की, या व्हीव्हीआयपींनाही लालबागचा राजा पावलाय म्हणून... नवस फेडण्यासाठी ते दरवर्षी न बोलवता येत असतात. मग या व्हीव्हीआयपींना थेट स्टेजवर एन्ट्री कशी देतात..? सामान्य भक्तांप्रमाणं त्यांना का नाही नवसाच्या रांगेत किंवा मुखदर्शनाच्या रांगेत उभं करतं..? की देवाच्या दरबारात व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना वेगळा प्रोटोकॉल असतो..? एरव्ही सिद्धीविनायकाला जाणारे हे सेलिब्रिटी गणेशोत्सवाच्या काळात मात्र `प्रसिद्धीविनायका`च्या दरबारात हजेरी लावतात. या सेलिब्रिटींसाठी दहा-दहा मिनिटे नवसाची रांग थांबवली जाते... म्हणजे राजाच्या दरबारात सामान्य भक्तांसाठी एक न्याय आणि व्हीव्हीआयपींसाठी दुसरा न्याय.
हा भेदाभेद `लालबागचा राजा`ला चालतो..?
हे सेलिब्रिटी, व्हीव्हीआयपी भक्त म्हणे हजारो-लाखो रूपयांचे दागदागिने राजाच्या चरणी अर्पण करतात. म्हणजे मर्सिडीज बेन्झमधून येणारे हे भाविक राजाला सोन्याचा मुकूट वाहणार, अंगठ्या देणार, दागदागिन्यांनी मढवणार... पण गाडीच्या बाजूला उभ्या असलेल्या भिका-याच्या कटोरीत एक रूपयाचे नाणेही टाकणार नाहीत. राजाला सोन्याचांदीची भेट दिली की, आपली सगळी पापे धुतली जातील, अशी बहुतेक त्यांची श्रद्धा असावी. नवसाच्या रांगेत उभं राहणा-यांची श्रद्धा वेगळी... आणि बाप्पाच्या पापभिरू सेलिब्रिटी भक्तांची श्रद्धा निराळी...
मस्तच.
माझे बरेच मित्र लालबागला राहतात. शाळेत असताना हेच मित्र आम्हाला पाठच्या गेटने गणेशगल्ली किंवा `लालबागचा राजा` गणपती दाखवायचे... पण आता त्यांचाही नाइलाज झालाय. `लालबागचा राजा`जवळ राहणा-या मित्रांची तर एवढी वाईट अवस्था आहे की, बिच्चा-यांना स्वतःच्या घरी जाण्यासाठी पास काढावा लागतो... शंभर ठिकाणी पोलिसांना पास दाखवावा लागतो, तेव्हा कुठे त्यांना स्वतःच्या घरी एन्ट्री मिळते. काय बोलायचं याला..? पण ही मंडळीही अजिबात कुरबुर करत नाहीत. उलट हल्ली भाव खाऊन असतात... कारण गणेशोत्सवाच्या काळात सगळेजण त्यांना शोधत असतात. रांग न लावता, गणपती पाहायला मिळावा यासाठी त्यांच्या मागे मित्रांचा, नातेवाईकांचा, ऑफिसमधल्या सहका-यांचा ससेमिरा लागलेला असतो. या मित्रांनाही त्यात मोठेपणा मिरवायला मिळतो. मी तर बाबा या धबडग्यात `लालबागचा राजा`च्या दर्शनाला जातच नाही... पण आमच्या ओळखीतल्या एका नातेवाईकाला दोन वर्षांपूर्वी `लालबागचा राजा` पाहायचा होता. मी माझ्या मित्राला फोन केला... पण या पठ्ठ्याने अनंत चतुर्दशीपर्यंत फोन काही उचलला नाही. अनंत चतुदर्शीनंतर तो स्वतःच माझ्या घरी आला. दहा-बारा नारळ घेऊन... म्हणाला, `लालबागचा राजाचा प्रसाद आहे.` मी म्हटलं, `अरे पण फोन का नाही उचलत होतास?` तर म्हणाला, `त्या काळात सगळे गणपती पाहायचाय म्हणूनच फोन करतात... कितीजणांना गणपती दाखवायचा? माझ्या बॉसला आणि त्याच्या बायकोला मात्र न चुकता `लालबागचा राजा`च्या पायावर घालतो... मग दहा दिवस निर्विघ्नपणे सुट्टी सँक्शन होते आणि बॅच लावून मिरवायलाही मिळते...`
त्याची ही गण`सेवा` पाहून मी फक्त त्याला हात जोडले...
मी जात नाही, तरीही `लालबागचा राजा` मला भेटतोच... पेपर वाचायला घेतला तर `लालबागचा राजा`... टीव्हीवर बातम्या पाहायच्या तर `लालबागचा राजा`... घरच्या केबल टीव्हीवर तर 24 तास त्याचे दर्शन होत असते. अनंत चतुर्दशीला श्रॉफ बिल्डिंगजवळची पुष्पवृष्टी पाहायला लहानपणी आईवडिलांबरोबर जायचो... आता मी माझ्या मुलाला घेऊन जातो... तिथंही `लालबागचा राजा` दिसतो. पावलापावलावर राजा मला भेटत असतो... दर्शन देत असतो...
रस्त्यावर नवसाच्या रांगेत उभं राहणारांची मग मला कीव येते... चीड येते...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.