Last Updated: Thursday, September 19, 2013, 00:18
अजित चव्हाण, www.24taas.com, मुंबईगणपती उत्सव सुरू झाला की सगळीकडेच कसं उत्सवाचं वातावरण असतं. दहा दिवस सगळेच भक्तीच्या रसात रंगतात. मात्र या उत्सवाच्या काळात आणखी एक जमात फॉर्मात येते आणि ती म्हणजे जुगा-यांची. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, मात्र गणेशोत्सवात सुरू होणारी `नाल` म्हणजेच तीनपत्ती, अंदर-बाहर, रम्मी अशा पत्त्यांच्या या जुगारावर पुढचे दोन-तीन-चार महिने कोट्यवधींची उलाढाल होते. जुगारी, कार्यकर्ते, नेते, पोलीस, हरकामे, दलाल, जॉकी (व्यावसायिक जुगारी ) काही ठिकाणी यांना खेळी म्हणतात, ते मालामाल होतात. तर अनेक कुटूंब याच काळात अक्षरशः उध्वस्त होतात. पूर्वीच्या काळी गणेशोत्सवाला विधायक स्वरूप होतं. कार्यकर्ते काटकसरीने उत्सव साजरा करतं.
अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत. या उत्सवात अनेक पिढ्यांवर संस्कार झाले, अनेक चांगले कार्यकर्ते घडले, आम्हीही याच उत्सवातून वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवलं. याच उत्सवानं आम्हाला घडवलं. अनेक मंडळांनी ही परंपरा जपली असली तरी तितकीच मोठी संख्या या मंडळांत जुगा-यांची आहे. अनेक जुगारी या काळात तयार होतात. त्यांच्या या गोरखधंद्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल या काळात चालते. हे थांबणं आता केवळ अशक्य आहे. कारण समाजासमोर उत्सवाचं हे काळं चित्र येतच नाही. गणपतीचं आगमन होताच मोठ मोठे क्लब चालवणा-या माफियांची लगबग सुरू होते. पूर्वी गणपतीच्या मांडवातच हे जुगार रात्री उशीरापर्यंत चालत. काही ठिकाणी तर मोठे स्टेज आणि त्याखाली जुगाराचे डाव रंगत. पण माध्यमातून येणा-या बातम्यांमुळं दबाव वाढला आणि हा धंदा मांडवात बंद झाला. आता हे मार्केट मांडवाच्या माघारी अत्यंत नियोजनबध्दरीत्या चालवलं जातं. गणपतीचे दिवस जवळ आले की मोठमोठ्या नेत्यांची मंडळं आपला भाव सांगतात. क्लब चालवणारे प्रोफेशनल त्यांची `नाल` म्हणजेच जुगाराचे अड्डे भाड्याने चालवायला देतात. ही रक्कम ५ लाखांपासून कोटीपर्यंत असते. मंडळाकडे ही रक्कम जमा केली जाते. यात पोलिसांचा हप्ताही ठरलेला असतोच. गणेशोत्सवात सुरू झालेले हे जुगाराचे अड्डे दोन ते तीन महिने चालतात. गणपतीच्या मंडपापासून जवळच कुठेतरी एखादा मोठा फ्लॅट, गोडाऊन किंवा मोठी जागा पाहून जुगाराचा हा डाव रंगतो. मोठं मंडळ असेल तर हा सरंजाम अगदी एसी असतो आणि सगळी `सोय` याच ठिकाणी असते. अट्टल जुगा-यांना निरोप जातात. वर्षानुवर्षे ठरलेलं असल्यानं अनेकांना तर निरोपाची गरजही भासत नाही. गावा-गावातून चांगले खेळी बोलावले जातात. त्यांचा तर कमावण्याचा सिझनच असतो. एखाद्याला जुगारात पैसे लावायचे असतात मात्र प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नसतो. त्यांच्यासाठी हे खेळी जुगार खेळतात. अनुभवाच्या जोरावर जास्तीत जास्त पैसे जिंकून देतो.
मात्र नंतर तो आपल्या मालकाचं उखळ पांढरं करून द्यायलाही कमी करत नाही हे वेगळं सांगायला नको. या निमित्तानं जमिनीचे पैसे खिशात खुळखुळणा-या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज़मधून फिरणा-या गावोगावच्या शेठ लोकांना मोठा विरंगुळा मिळतो. दोन नंबरच्या धंद्यात हाताखाली काम करणारे, वेळ आल्यावर केसेस अंगावर घेणारे, पोलिसांचा मार खावूनही न कबुलणारे, दुस-यांच्या केसेस अंगावर घेणा-यांना तुलनेन सुरक्षित आणि चांगली आर्थिक प्राप्ती करून देणारा हा काळ असतो. हे अड्डे चालवणारे गँम्बलर शेठ लोक हे वरपर्यंत पोहच असणारे आणि राजकीय वर्तुळात चांगलीच उठबस असणारे असल्यानं वर्दीवाल्यांचा फारसा धाक नसतोच. शिवाय असे अड्डे ज्या मंडळांच्या नावाखाली चालवले जातात, ती मंडळं बहुतांश वजनदार राजकीय नेत्यांची कार्यकर्त्यांची असल्यानं सगळी सेंटींग फुलटू असते. चोरीचा मामला हळूहळू बोंबला असं सगळं असल्यानं पोलिस चोख हप्ता वाजवुन घेतात. शिवाय कायदा सुव्यवस्थेचं टेंशन नसतंच. कारण भाईच्या मंडळात राडा करायला चांगल्या-चांगल्यांची फाटत असल्यानं सिनियर सायबाला ( वरिष्ठ पोलिस निरिक्षक) तस टेंशन नसतंच. शिपायापासुन सिनियर सायबापर्यंत सगळ्यांनाच पाहिजे ते पुरवलं जातं. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया म्हणत खो-यान पैसा ओढला जातो. दरवर्षी या सगळ्या वर्तुळाच कुणाची नाल कितीला गेली, याची जोरदार चर्चा असते. शिवाय मोठ-मोठे शेठ, बिल्डर, गुंड, राजकीय नेते यांच्या अनेक दिवसातुन भेटीगाठी होतात. टेबलावर खेळता खेळता मोठमोठे व्यवहार ठरतात. ही सगळी हाय प्रोफाईल मंडळी पाच दहा लाख सहज खेळून मोकळी होतात. खेळायला बसल्यावर किंमती स्कॉचच्या बाटल्या, फायफायफायची पाकिट टेंशनमध्ये रिकामी होतात. एखाद्या भिडूला मोठी ढाय (मोठ्या रकमेचा जँकपॉट) लागली की हरकाम्या पो-यांचे डोळे चमकतात आणि त्यांचीही हजारोंची कमाई होते. संध्याकाळ झाली की हे सगळे भिडू जमतात. एक वेगळीच दुनिया जमते. वर्षानुवर्षीचे दोस्त जमतात. ज्यांच्याकडे भरपुर पैसा आहे, ते या दिवसात भरपुर एन्जॉय करतात. काही तर जुगारावर आपण कशी प्रॉपर्टी केली हे अभिमानानं सांगतात. मग पहाटेपर्यंत खेळ रंगतात. खेळून झाल्यावर रिलँक्स करायला काहींची ठिकाणं ठरलेली असतात. जिंकल्यावर तिथं आपल्या आवडतीवर पैसे उडवले जातात, हरल्यावर टाईटमध्ये टेंशन काढता येतं... तशा याच काळात मग एस्कॉर्ट सर्विसेस पुरवणा-या आंट्या, कला केंद्रवाल्या आक्का, पोरी पुरवणा-या पंटरांची चलती असतेच. कारण जिंकल्यावर खुळखुळणारे पैसे स्वस्थ बसु देत नाहीत. शिवाय आबांनी डान्सबार बंद आहेत अस ठासून सांगितलं तरी छमछम कुठंकुठं सुरू आहे याची या वर्तुळातल्या शौकिनांना चांगलीच माहिती असते. मुंबईपुरतं बोलायचं झालं तर अगदी गजबजलेल्या दादरच्या चित्रा सिनेमाच्या जवळची हॉटेल असो किंवा पनवेल, मिरा रोड पासुन हायवेची अनेक ठिकाण असो, आर्केस्ट्रा बार नाही तर प्रॉपर डान्सबार सुरू आहेतच. पण एन्ट्री खास लोकांना नाही तर नेहमीच्या कस्टमरलाच असते. शिवाय अड्ड्यावरची पोरांची मुद्दाम जिंकलेल्या शेठला काटा कडक माल कुठं आलाय याची माहिती देण्यासाठी चढाओढ लागते. कारण कमिशन दोन्ही ठिकाणावरून मिळणार हे पक्क असतंच. हा भाग झाला दौलतजादा करणा-यां पैशावाल्यांचा. पण जुगाराचं व्यसन लागलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरिब माणसाला खासकरून ग्रामीण भागात मात्र हे अड्डे आयुष्यातुन उठवतात. एकदा जिंकला की तारांबलेल्या डोळ्यांनी सकाळी सकाळी घरच्या बाईला दोन-तीन तोळ्यांचा दागिना कऱणारा जुगारी पुन्हा त्याच सिझनला तिच्याकडचे असलेले दागिने मोडायला हमखास येतोच. हा एका सुवर्णकार मित्राने सांगितलेला अनुभव. या अड्ड्यावर ओळखीच्या खेळींना रात्रीपुरते 10 टक्के व्याजानं पैसे देणारे सावकार असतातच. जिंकला तर लगेच पैसे चुकते मात्र हरला तर घरदार विकुन, दुभत्या गायी म्हशी विकुन, सावकारांचं देणं द्यावंच लागत. पुर्णपणे हरणा-याला घरी जायची सोय केली जाते. तितके पैसे त्याला अड्डा चालवणा-याकडून दिले जातात. हा दोन नंबरच्या या धंद्याचा उसुल आहे अनेकांचे संसार यामुळं उध्वस्त होतायेत. एकदा जुगाराची चटक लागली की सुटणं अवघड. अनेकजण शपथा घेतात. पुन्हा खेळणार नाही... पण सवय काही सुटत नाही. यामुळं पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते केलं जातं. शहर काय किंवा ग्रामीण भागात काय जुगारामुळे अनेक जणांचा धंदा बुडाला.
कर्ज झाली, अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. घरं उघड्यावर पडली, पण जुगाराचे अड्डे चालवणारे आणि पाठिंबा देणारे गब्बर झाले. व्यापारी लोकांमध्ये जुगार खेळणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. लक्ष्मीपुजनाला शुभशकुन म्हणुन एक डाव तरी खेळण्याची परंपरा आहे. या द्युतामुळे महाभारत घडलं... ती परंपरा अजुनही सुरू आहे. जुगाराचे अड्डे वर्षभर चालतातच. पण गणपतीच्या काळात जुगार अड्डे चालवण्याची सुरू झालेली ही पध्दत आता कुणीही बंद करू शकत नाही, असं दुर्देवानं म्हणावं लागतं. कारण पुर्ण सिस्टीमला यातुन मिळणा-या पैशाची चटक लागलीय. बाप्पाच्या नावानं भरणा-या उत्सवात हे सगळ चालतं, याचं वाईट वाटतं....
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.