www.24taas.com, मुंबई महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधा-यांना झटका बसलाय. तर काही ठिकाणी अनपेक्षित यश मिळालंय. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. तर सांगलीत पतंगराव कदमांबरोबरच्या लढतीत जयंत पाटलांनी बाजी मारली आहे. तर कोकणात ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्या तरी येथे त्रिशुंकू परिस्थिती आहे. रायगजमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली तरी सत्ता शेकाप-सेना-भाजप-आरपीआय महायुतीची असणार आहे. तर सिंधुदुर्गात नारायण राणेंना विरोधकांनी लढा दिल्याने येथे जरी काँग्रेसची सत्ता असली तरी जागा कमी झाल्या आहेत. तर रत्नागिरीतही सत्ताधारी युतीने सत्ता काबीज केली तरी युतीच्या जागा कमी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीने जम बसविला आहे.
सांगली - आर आर , जयंत पाटलांची बाजीगृहमंत्री आर आर पाटील आणि जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज करण्यात य़श मिळवलंय.
जिल्हा परिषदेच्या ६२ पैकी ३४ जागांवर विजयश्री मिळवत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवलंय. तर काँग्रेसला २३ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर जिल्ह्यातल्या १० पंचायत समित्यांपैकी राष्ट्रवादीकडे ५ तर काँग्रेसने ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवलंय. एकूणच पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांच्यातल्या या सामन्यात जयंत पाटलांनी बाजी मारलीये.
कोल्हापूर- घराणेशाहीला 'दे धक्का' कोल्हापूर जिल्हा परिषदेत यावेळी जोरदार फेरबदल झालेत. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांच्या घराणेशाहीला कोल्हापुरकरांनी दे धक्का दिलाय. तर काँग्रेसच्या पारड्यात भरभरून यश मिळालंय. कागलमध्ये सदाशिव मंडलिक यांनी जोरदार यश मिळवलंय. तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलाला पराभव स्विकारावा लागलांय. तर राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांना घवघवीत यश मिळालंय.
औरंगाबाद - सत्तेची चावी मनसेकडेत्रिशंकू अवस्था निर्माण झालेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्तेची चावी मनसेच्या हाती जाण्याची चिन्हं दिसताहेत. गेल्यावेळी २४ जागा मिळवणा-या शिवसेनेला यंदा १७ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर मनसेने मुसंडी मारत एका जागेवरून थेट यंदा ८ जागांवर विजयश्री मिळवलीये. भाजपला ६, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्यात.
परभणी - सेनेचा बालेकिल्ला ढासललापरभणी जिल्हा परिषदेत सलग दुस-या वेळीही सत्ता राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरलीये. एकेकाळच्या शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला २५ जागांवर यश मिळालंय. तर काँग्रेसला ८, शिवसेनेला ११ आणि भाजपला २ जागांवर समाधान मानावं लागलंय. शिवसेनेतील अंतर्गत कलह पराभवास कारणीभूत ठरल्याचं मानलं जातंय.
जळगाव - सेना-भाजपा युतीची हॅटट्रिकजळगाव जिल्हा परिषदेवर हॅटट्रिक साधत सेना-भाजपा युतीनं झेंडा फडकवलांय. भाजपनं सर्वाधिक २३जागांवर विजय मिळवलांय. तर शिवसेनेनं १५ जागांवर विजय मिळवलांय. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. विद्यमान अध्यक्षा स्मिता वाघ या मंगरुळ-जानवे गटातून विजयी झाल्यात.
चंद्रपूर - काँग्रेस-भाजपा अनोखी युती काँग्रेस-भाजपा अशी अनोखी युती असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसनं सर्वाधिक २१जागांवर विजय मिळवत बाजी मारलीये. तर भाजपनेही १८ जागा मिळवत दबदबा कायम राखलाय. त्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपची युती होते की काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपा प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लापूरमध्ये मात्र भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही.
First Published: Saturday, February 18, 2012, 20:28