कऱ्हाकाठची साहित्य चळवळ, Marathi Sahitya Sammelan

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ
दशरथ यादव, पुणे

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. पिलाजी जाधवराव यांची गढी, सरदार पानसे यांचा सोनोरीचा मल्हागड, पुण्याचे वेरुळ म्हणून प्रसिद्ध असलेले यादवकालीन भुलेश्वर मंदिर, उमाजीनाईकांचे जन्मस्थान, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, आचार्य अत्रे यांचे कोडीतगाव, संत सोपानदेवांची समाधी असा वैभवशाली इतिहास लाभला आहे.

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे सासवड (ता.पुरंदर) येथे होत आहे. साहित्यक्षेत्रात मोलाची भर कऱ्हाकाठच्या साहित्यिकांनी घातली आहे. साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे क-हाकाठावर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत सोपानदेव, पुरंदरदास, श्रीधरपंत, संभाजीमहाराज, महात्मा फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, कृ.वा.पुरंदरे, आचार्य अत्रे, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत अशा साहित्यरत्नांचा वारसा क-हाकाठाला आहे. बुधभूषण चा मराठी अनूवाद करणारे प्रा.प्रभाकर ताकवले, खरा संभाजी व शिवराय लिहिणारे नामदेवराव जाधव यांच्या पर्यंत मोठा वारसा पुरंदरला आहे.

"सातगड नऊ घाटांची
ही दौलत मराठ्यांची रं
शिवशंभुची ललकार
या मातीतूनी फुटं रं"

असा गौरवशाली इतिहास अंगाखांद्यावर मिरविणाऱ्या कऱ्हाकाठाला जसा इतिहासाचा मोठा वारसा आहे. तसा साहित्यलेखनाची एक परंपरा अव्यहात पणे सुरु आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया येथेच घातला. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्राचे बार्डोली झालेली सासवड हीच भूमी आहे. अंधश्रद्धा व जातीच्या विळख्यातून समाजाला सोडविणारी सत्यशोधक चळवळ महात्मा फुले यांनी इथेच सुरु केली. साहित्य चळवळही सुरु आहे. क-हाकाठावर साहित्य चळवळीची बीजे स्वातंत्र्यानंत रुजवली ती प्रल्हाद केशव अत्रे यांनी. या सगळ्या प्रेरणा घेऊन संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी आचायर्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.

१९९८ साली आठवे विभागीय साहित्य संमेलन क-हाकाठावर झाले. त्यावेळी आचायर्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे असा प्रयत्न होता. त्यानंतर दरवर्षी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन सुरु केले. कऱ्हाकाठाला साहित्याची गोडी यानिमित्ताने लागली. या सगळ्या कामात रावसाहेब पवार, दशरथ यादव पहिल्या पासून आहेत. त्यानंतर एवढी मोठी हिमालयाच्या उंचीची माणसं साहित्यक्षेत्राला लाभली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दशरथ यादव यांच्या संयोजनाखाली महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. त्यानंतर सासवडला छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सुरु केले. याकामात मला शऱद गोरे, राजकुमार काळभोर, सुनील धिवार, दत्ता भोंगळे, श्रीकृष्ण नेवसे यांची मदत होत. शंभुराजे साहित्यिक होते, त्यांच्या नावाने देशातील हे पहिलेच साहित्य संमेलन सुरु झाले. दरवर्षी ही संमेलने होतात. एकाच तालुक्यात दरवर्षी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलने होणारा हा देशातील एकमेव तालुका आहे. त्यामुळे शेकडो साहित्यिकांची रीघ कऱ्हाकाठावर लागते. यातूनच साहित्यचळवळ रुजली. याचाच परिणाम म्हणून ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला होत आहे.

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य रसिकांनाही चांगली गोडी लागली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कऱ्हाकाठावर साहित्याचा जागर होऊ लागला.

साहित्यिक संभाजीराजे
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला. बालपणीच दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. क-हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळयांचा मुलासोबत शंभुराजांचे बालपण गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा व शौर्याने संभाजीराजांची राजकारण, साहित्य, समाजकारण याविषयीची दृष्टी अधिक दृढ होत गेली. राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले. सुरवातीला त्यांची सावत्रआई सोयराबाई यांनीही खूप माया केली. शंभुराजे देखणे व शूर होते. राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले. मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयात कळाले. वयाच्या ९ व्या वर्षीच शिवरायांनी त्यांना जाणीपूर्वक आग्रा येथे आरंगाजेबाच्या भेटीवेळी नेले होते. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोपर्य़ंत संभाजीराजे बारकावे व रणांगणातील डावपेचात तरबेज झाले होते.

साहित्य लेखन
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे.

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥


होनाजी बाळा
वंशपरंपरागत शाहिरी : होनाजी हा क-हाकाठावरील सासवडमधील गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाड्यावर दुधाचा रतीब घालणे व सांयकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी मनोरंजन करीत. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसा शाहिरीचा पण व्यवसाय वंशपरंपरागत होता. होनाजीचे आजोबा साताप्पा किंवा शाताप्पा हे व त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषःता होनाजीचा चुलता बाळा हा लावणीकार होता. तो बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता. ते दोघे बाळा बहिरु नावाने तमाशाचा फड चालवीत होते. बाळाजीची हीच परंपरा पुढे होनाजीने चालविली. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा करंजकर हा सासवडच्या शिंपी समाजातील होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजविला. त्याने होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले.

होनाजी बाळा (इ.स.१७५४-इ.स.१८४४) मुळचा सासवडचा होता. नंतरच्या काळात तो पुणे येथे राहत होता. होनाजीचे आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजीने रागदारीवर अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचना त्यांनी केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या लावणीला आज भूपाळीचे महत्व प्राप्त झाले. होनाजी काव्य करायचा व बाळा गायन करीत होता. म्हणून त्यांच्या फ़डाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत.

शाहिर सगनभाऊ
जेजुरीचे रहिवासी सगन पेशवाईच्या काळात वीर रसाबरोबर शृंगार रसाचीही शाहिरीमध्ये भर पडली. श्रीमंत नानासाहेब पेशवे व दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात शाहिरीला राजश्रय मिळाला. उत्तर पेशवाईत मराठी शाहिरीला बहर आला. मराठी स्त्री पुरुषाच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाडःमय भरभरुन लिहिणारे, अनंतफंदी (इ.स.१७४४ ते१८९९), रामजोशी (इ.स.१७५८ते १८८३), शाहीर परशराम (इ.स.१७५४ते१८४४), होनाजी बाळा (इ.स.१७५४ते१८४४), प्रभाकर (इ.स.१७५२ते१८४३), सगनभाऊ (इ.स.१७७८ते१८५०) यांच्या जीवनासंबधी व त्यांनी लिहिलेल्या लावण्याबाबत मराठी माणसांच्या मनात कुतूहल व आकर्षण आहे.

शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठऱले. शाहीर सगनभाऊ मुळचे जेजुरी (ता.पुरंदर) येथील रहिवासी. वंशपरंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना व काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्याला गेले. नामवंत शाहिरांसोबत आपली कवने सादर करु लागले. थोड्याच कालावधीत यश व प्रसिद्धी मिळाली. सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनही ते मराठीशी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरुप झाले होत. हत्यारांना धार लावण्याचा त्यांचा धंदा. पण पिढीजात धंद्यात विशेष रस नसल्याने शाहीरीत रमले.

कोथळे गावचा भाऊ गोंधळी
होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर यांना जसे एकत्रित होनाजी बाळा असे नाव मिळाले. सगन मुस्लीम धर्मीय होता. जेजुरीपासून पाच किलोमीटरवर क-हा नदीच्या काठावर असलेल्या कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे एकत्रित नामाभिधान झाले. जेजुरीकरांच्या मनात आजही सगनभाऊ बद्धल प्रेम व अभिमान आहे. जेजुरीत नोंव्हेंबर मध्ये सांस्कृतिक महोत्सवात ही रात्र शाहिरांची, लोकनाट्य, लोकसंगीत असे कार्यक्रम रंगविले जातात. भाऊ गोंधळी यांच्या गावी मात्र अजूनही त्यांचे भव्यदिव्य असे स्मारक नाही. सगनभाऊच्या फडात गाणा-या पैकी राम गोंधळी हा उत्कृष्ठ आणि विशेष प्रसिद्ध होता.

महात्मा जोतिबा फुले
महात्मा फुले (इ.स.१८२७ - नोव्हेंबर २८ १८९०) हे मराठी, भारतीय समाजाचे आधुनिक समाजसुधारक होते.
त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे जमिनीचा सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. सासवडपासून सात किलोमीटर अंतरावरील खानवडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे तेथे घर होते. जमिन होती. अजूनही त्यांच्या नावाने सातबारा तिथे पाहायला मिळतो.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
मराठी साहित्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असे अचाट काम करणारे साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे (इ.स.१३ ऑगस्ट १८९८ - इ.स१३ जून १९६९) यांचे मूळ गाव कोडीत. पुरंदरचे पहिले आमदार बापूसाहेब खैरे यांच्या ते गावचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली पराक्रम, पुरंदर किल्ला, संत सोपानदेव व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या रुपाने साहित्याचा प्रवाह क-हेतून सदैव खळखळत आहे. शौर्य, पराक्रम, अध्यात्माचा वारसा अंगाखांद्यावर खेळवीत दिमाखात उभ्या असलेल्या शिवशंभुच्या पुरंदराची प्रेरणा हीच आचार्य अत्रे यांच्या लेखनाची ताकद आहे.

आचार्य अत्रे हे वक्ता, पत्रकार, लेखक, चित्रपटकार, विडंबनकार, शिक्षणतज्ञ, नाटककार, राजकारणी यासगळ्या क्षेत्रावर त्यांचा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते म्हणूनही त्यांनी प्रभाव पाडला होता. पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.

शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीचीखिंड, बाबदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट शिंदवणेघाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले. शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर बाजी पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आहे. सासवड-किल्ले पुरंदर मार्गावर श्री. वटेश्वर हे पुराणप्रसिद्ध जागृत स्वयंभू शिवालय आहे. प्राचीन काळी ही सिद्धसाधकांची तपोभूमी होती. याच स्थळी ब्रम्हदेवाने श्रीशंकराची आराधना केली. गहन तपाने संतुष्ट होऊन कैलासपती त्यास प्रसन्न झाले. “महातीर्थे व्रत दैवते | ब्रह्मा झाला निर्मिते ते हे स्थळ |”

First Published: Saturday, January 4, 2014, 08:00


comments powered by Disqus