Last Updated: Tuesday, September 17, 2013, 14:57
www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर आसाराम बापूंचं वकिलपत्र घेतलेल्या राम जेठमलानी यांनी या केसला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. आसाराम बापूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असा दावा राम जेठमलानी यांनी कोर्टात केलाय.
बापूंची बाजू मांडण्यासाठी सोमवारी न्यायालयात आलेल्या जेठमलानी यांनी पहिल्याच दिवशी या केसला वेगळीच कलाटणी दिली. बापूंच्या जामिनासाठी यापूर्वी सत्र न्यायालयात मांडण्यात आलेल्या युक्तिवादाचाच पुनरुच्चार करताना जेठमलानी यांनी हे प्रकरण फिरवणारे काही मुद्दे मांडले.
`एफआयआरमधील नोंदी, गुन्हा घडलेलं ठिकाण आणि मुलीचं वय यात बराच विरोधाभास असून हा संपूर्ण खटलाच बनावट असल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला. संबंधित मुलगी एका आजाराची शिकार असून, त्या मानसिक विकृतीमुळं तिला परपुरुषाशी एकांतात भेटण्याची इच्छा होते. गेल्या सहा महिन्यांपासून ती या विकृतीची शिकार आहे आणि आमच्याकडे त्यासंबंधीचा रिपोर्टही आहे, असा दावाही जेठमलानी यांनी केला.
जेठमलानी यांच्या या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती निर्मलजीत कौर यांनी आसारामांच्या जामिनावरील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढं ढकललीय. तसंच पुढील सुनावणीच्या वेळी या प्रकरणाची केस डायरी सादर करावी आणि मुलीच्या जन्मतारखेसंबंधीची खरी नोंदही मिळवावी, असे आदेश कोर्टानं पोलिसांना दिले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 17, 2013, 14:47