Last Updated: Monday, January 28, 2013, 17:03
www.24taas.com, नवी दिल्ली दिल्ली बस गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अल्पवयीन असल्याचं कोर्टात सिद्ध झालंय. शाळेच्या दाखल्याचा पुरावा ग्राह्य धरून कोर्टानं `त्या` आरोपीला अल्पवयीन मानलंय तसंच यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेली आरोपीच्या हाडांच्या तपासणीची मागणीदेखील कोर्टानं केली नामंजूर केलीय.
यापूर्वी राजधानी दिल्लीत डिसेंबर महिन्यात झालेल्या गँगरेप प्रकरणातील सहाव्या आरोपीच्या वयाबाबत कोर्टामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, याच कोर्टानं अल्पवयीन मानलेल्या आरोपीनं पीडित मुलीला क्रूरतेनं जखमीही केलं होतं. दिल्ली बाल न्यायालयानं आज या आरोपीला अल्पवयीन ठरवलंय. त्यामुळे आता या ‘अल्पवयीन’ आरोपीवर सुनावणी इतर आरोपींसोबत होणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
दुसरीकडे, याच प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात बचाव पक्षाचे वकील आरोपांवरून कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत. आरोप निश्चित झाल्याबरोबर कोर्टात आरोपींवर ट्रायल सुरू होईल. सहाव्या आरोपीचा शाळेचा दाखला अयोग्य मानला गेला असता तर या आरोपीच्य़ा हाडांच्या तपासणीला परवानगी मिळू शकली असती. या प्रकरणात सहाव्या आरोपीवरून सुरुवातीपासूनच बरीच चर्चा सुरू आहे. या आरोपीच्या मुख्याध्यापकांनी सादर केलेल्या दाखल्यानुसार आरोपीचं वय १७ वर्ष आणि सहा महिने आहे. तर दिल्ली पोलिसांनी या आरोपीच्या हाडांची तपासणी करण्याची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयानं फेटाळून लावलीय.
First Published: Monday, January 28, 2013, 17:03