Last Updated: Thursday, November 1, 2012, 19:53
www.24taas.com, नवी दिल्ली विना अनुदानित घरगुती गॅस दरात आज सरकारने २६ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात आता गॅस सिलिंडरसाठी एक हजाराच्या घरात पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरात स्थानिक करानुसार वेगवेगळा दर आकारला जात आहे. तेथे आता प्रत्येक सिलिंडरसाठी आणखी २६ रुपये जास्त मोजावे लागतील. मुंबईत आता ९३३ रुपयांना विनाअनुदानित सिलिंडर मिळेल.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयानुसार स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्या गॅस सिलिंडरची मूळ उत्पादन किंमत ९९६ रुपये आहे. मात्र, सरकारकडून ते ग्राहकांना सवलतीच्या दरांत ४०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाते. यामुळे सरकारला अनुदानित सिलिंडरमागे 570 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. मात्र आता मूळ उत्पादनाचा खर्च वाढल्याने बाजारातील गॅसचाही दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तेल कंपन्यांचा तोटा कायम - पेट्रोल, डिझेल, केरोसिन, एलपीजी सिलिंडरसारख्या पेट्रोलियम पदार्थांची मूळ उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला विक्री होत असल्यामुळे सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात १.५० हजार कोटी रुपयांवर तोटा जाण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने तेल कंपन्यांना तोटा भरुन काढण्यासाठी किंमत वाढविण्याचा पर्याय सुचविला होता.
First Published: Thursday, November 1, 2012, 19:53