काँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी, modi on pranab mukherjee

काँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी

काँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर नरेंद्र मोदींची बुधवारी जंगी सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. इंदिरा गांधींच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी हेच पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते. मात्र, घराणेशाहीमुळे त्यांना संधी मिळाली नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली. २००४ मध्येही प्रणवदांना संधी मिळायला हवी होती, असं ते म्हणाले. यावेळी सेक्युलेरिझमचे गीत गाणाऱ्या कम्युनिस्ट आणि थर्ड फ्रंटमुळे बंगालचा विकास झाला नसल्याची टीकाही मोदी यांनी केली.

काँग्रेसमध्ये महत्त्वांच्या पदांची जबाबदारी भूषविणारे प्रणव मुखर्जी यांना दोन वेळा देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती, पण काँग्रेसमध्ये असणाऱ्या गांधींच्या घराणेशाहीमुळे त्यांची या दोन्ही संधी हुकल्या, याबद्दल मोदींनी खंत व्यक्त केली.

कोलकातातल्या ब्रिगेड परेड मैदानात पक्षाच्या रॅलीला मोदी संबोधित करत होते. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी कोलकात्यात होते आणि ते तिथून परत आले. लोकशाहीनुसार त्यावेळी इंदिरा गांधी सरकारमध्ये सगळ्यात वरिष्ठ मंत्री प्रणव मुखर्जी हेच होते. त्यावेळीच त्यांना देशाचा पंतप्रधान पदाचा मान मिळायला हवा होता, असं यावेळी मोदींनी म्हटलं.

`पण, काँग्रेसनं असं केलं नाही. तेव्हाच गांधी परिवाराला काही तरी कुणकुण लागली होती. म्हणूनच जेव्हा राजीव गांधी यांचं सरकार बनलं तेव्हा जेष्ठ नेते असलेले प्रणवदा मंत्रिमंडळातही नव्हते. २००४ मध्येही प्रणवदा हेच सर्वात वरिष्ठ राजनीतीज्ञ होते. सोनिया गांधी यांना स्वत: पंतप्रधानपदावर बसायची इच्छा नव्हती, तेव्हाही हे खूप स्वाभाविक होतं की ही संधी प्रणवदांनाच मिळायला हवी होती. परंतु, याही वेळेस मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदावर बसवलं गेलं. ही संधीदेखील प्रणवदांनी गमावली` असं म्हणत बंगालच्या नागरिकांनी ही गोष्ट विसरु नये, असं देखील मोदी यांनी म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 09:43


comments powered by Disqus