Last Updated: Tuesday, May 14, 2013, 19:37
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.
मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असणारं वातावरण सध्या अंदमान निकोबारमध्ये तयार झालंय. ही गूड न्यूज दिलीय भारतीय हवामान खात्यानं. सामान्यपणे अंदमान-निकोबार या भागात 20 मे पर्यंत मान्सून दाखल होतो. आणि त्यानंतर दहा दिवसात केरळमध्ये त्याचं आगमन होतं. मात्र यंदा अनुकुल परिस्थिती असल्याने मान्सूनचं आगमन वेळेच्या आधीच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. यंदा भारतात विशेषतः महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असल्याने त्यात पारा चढल्याने सर्वजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहातायत.
चक्रीवादळाची बांगलादेश आणि म्यानमार किनारपट्टीच्या दिशेने संथगतीने वाटचाल सुरू आहे. सोमवारी दुपारी उपसागरात चेन्नईपासून आग्नेयेला सुमारे सातशे किलोमीटर अंतरावर ताशी दहा किलोमीटर वेगाने उत्तरेकडे बांगलादेशच्या दिशेने ते सरकत होते.
बुधवारी सकाळपर्यंत अंदमान- निकोबारमध्ये वाऱ्यांचा वेग ४० ते ४५ किलोमीटर प्रतितासावरून ६० किलोमीटर प्रति तास होण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्र खवळलेला राहून अंदमान-निकोबारसह ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 19:35