भंडारा प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, National Commission for Women on bhandara issue

भंडारा प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

भंडारा प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
www.24taas.com, भंडारा

भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात झालेल्या तीन बहिणींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला १५ दिवस उलटले तरी एकही संशयीत पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसंच घटनेनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन वगळता या प्रकरणी कोणतीही ठोस पाऊले उचलण्यात आलेले नाहीत. दरम्यान, प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं घेतलीय.

या प्रकरणी आतापर्यंत २०० जणांची चौकशी करण्यात आलीय. मात्र, या चौकशीतून पोलिसांच्या हाती काहीही ठोस माहिती लागलेली नाही. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्निचिन्ह उपस्थित झालेलं आहे. भंडाऱ्यात आलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस प्रशासनावरच ताशेरे ओढलेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सावंत प्रभावळकर यांनी पीडित कुटुंबाची गावात जाऊन भेट घेतली. तसंच या तिघींचे मृतदेह सापडलेल्या ठिकाणची पाहणी केली. झालेला प्रकार अत्यंत निर्दयी आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. ग्रामीण भागातलं पोलीस प्रशासन निष्क्रीय असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याची टीका त्यांनी केलीय. न्यायवैद्यक चाचणीचा अहवाल आला असला, तरी अजून दोन अहवाल येणं बाकी आहेत अशी माहिती त्यांनी दिलीय. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशीही चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलंय.

First Published: Friday, March 1, 2013, 15:18


comments powered by Disqus