Last Updated: Sunday, August 18, 2013, 16:04
www.24taas.com , झी मीडिया, जम्मू जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.
रात्री अडीचच्या सुमाराला पाकिस्तानी हद्दीतून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले अतिरेकी भारतीय सैन्यदलांच्या नजरेला पडले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. या अतिरेक्यांना रोखण्यात आलं. त्यानंतर जोरदार गोळीबारही झाला. जवळपास तीन तास धुमश्चक्री सुरू होती. त्यानंतर अतिरेकी एलओसी पार करून पाकव्याप्त काश्मिरमध्ये पळून गेले.
या धुमश्चक्रीत कोणतीही हानी झालेली नाही. या प्रकारानंतर हंडवारा जंगलात सुरक्षारक्षकांनी जोरदार सर्च ऑपरेशन सुरू केलंय. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषवरील वातावरण तणावग्रस्त आहे. पाक सैन्याकडून १९ वेळा शत्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. पाकिस्ताननं भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबाराच्या घटना सतत सुरूच आहेत. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय.
भारतात घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्ताननं बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) तयार केली आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या हाती लागली आहे. बॉर्डर अॅक्शन टीम ही भारतीय सीमा रेषेवरील गावांमध्ये आणि लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करते आणि घुसखोरीचा प्रयत्न करते. तसंच ज्या विभागात पाकिस्तानी घुसखोरांनी अद्याप हल्ला केलेला नाही अशा भागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही टीम काम करत असल्याची माहिती सैन्याच्या हाती लागली असल्याचं ब्रिगेड कमांडर ए. सेनगुप्ता यांनी सांगितलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 18, 2013, 16:04