पेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय - Marathi News 24taas.com

पेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय

www.24taas.com, गोवा, नवी दिल्ली
 
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता  बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.
 
गोवा भाजपनं सायकल रॅलीचे आयोजन करून या दरवाढीचा निषेध नोंदवला. पणजीतील भाजप कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरभर फिरली. भाजप कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेनंही मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग घेतला.
 
केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री जयपाल रेड्डींनी नागरिकांना काहीसा दिलासा दिलाय. तूर्तास डिझेल आणि गॅसची दरवाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच केरोसिनचे दरही वाढणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.त्यांच्या या वक्तव्यामुळं आधीच पेट्रोलच्या दरवाढीमुळं आर्थिक भार सहन करत असलेल्या आम आदमीला थोडासा का होईना पण दिलासा मिळाला आहे.
 
पेट्रोल दरवाढीच्या झळांनी ऐन उन्हाळ्यात हैराण झालेल्या दिल्लीकरांना थोडा दिलासा मिळालाय. दिल्लीत पेट्रोलवरील २०% व्हॅट कमी करण्याचा निर्णय दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घेतलाय. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर १.२६ रूपयांनी कमी होणार आहे.
 
केंद्र सरकारच्या पेट्रोल दरवाढी विरोधात यूपीएचा घटक पक्ष तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींच्या पाठोपाठ द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधीही रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या ३० मे ला करूणानिधी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईत सईदापेट येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
 

First Published: Tuesday, May 29, 2012, 08:58


comments powered by Disqus