देशभरात पेट्रोल दरवाढीचा निषेध... - Marathi News 24taas.com

देशभरात पेट्रोल दरवाढीचा निषेध...

 www.24taas.com
 
देशभरात पेट्रोल दरवाढीमुळे संताप उसळलाय. याच संतापामुळे एनडीएनं पुकारलेल्या आजच्या एका दिवसाच्या भारत बंदला भारतात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाहुयात, पेट्रोल दरवाढीवरून देशभरात कसा निषेध केला गेला केंद्र सरकारचा...  
 
 
 
 
 भाजपचं आवाहन
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी युपीएतल्या घटक पक्षांना काँग्रेसच्या धोरणांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचं आवाहन केलंय. नसता जनता काँग्रेस आणि युपीएतल्या घटक पक्षांना धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय.
 
दिल्ली
पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडालाय. त्याविरोधात आज एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय. तर सीएनजीच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिलाय. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत एचपीसीएलनं दिलेत.
 
लखनऊ
उत्तरप्रदेशच्या सत्ताधारी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रेल्वे रोको केला आहे. सपानं केलेल्या राज्यव्यापी बंदच्या आवाहनाला शेकडो कार्यकर्ते लाल टोपी घालून रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसलं. अलाबाद रेल्वेमार्ग ठप्प करत या आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. यावेळी साकेत एक्सप्रेस आणि गंगा गोमती एक्सप्रेस थांबवण्यात आली. वाराणसीमध्येही रेल्वे स्टेशनजवळ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत  उपस्थिती दर्शवली यावेळी सुल्तानपूर एक्सप्रेस काही काळासाठी कार्यकर्त्यांनी रोखून धरली.
 
बंगळुरू
भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकात भारत बंदचा परिणाम जनजीवनावरही जाणवला. यावेळी ३ बसेस जाळण्यात आल्या. अनेक बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाला अखेर सार्वजनिक बसेस बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी कार्यालय, दुकानं बंद ठेवण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. बंगळुरू महानगर परिवहन निगमनं आज संध्याकाळपर्यंत बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
 
शिमला
हिमाचल प्रदेशमध्ये गुरूवारी सकाळपासून दुकानं आणि कार्यालयं बंदच होती. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी बंदची हाक दिली होती. शिमलामध्ये जवळजवळ ६००० दुकानदारांनी आपली दुकानं बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण वाहतूक व्यवस्थेवर फारसा परिणाम जाणवला नाही.    
 
अलाहाबाद 
पेट्रोल दरवाढीविरोधात अलाहाबादमध्ये सपाच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केलाय. विरोध प्रदर्शन करून दिल्ली-हावडा रेल्वे रुट त्यांनी जाम केलाय. तर पटणामध्येही जेडीयूकडून रेल रोको करण्यात आला. नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रोखून धरण्यात आला.
  
महाराष्ट्रातील बंदच्या अपडेट घडामोडी जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा  
 
टीकेची झोड
पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर चोहीबाजूंनी टीकेची झोड उठलीय.सर्वसामान्यांच्या विरोधातली धोरणं थांबवली नाहीतर सरकारमध्ये राहणार नाही असा इशारा करुणानिधींनी दिलाय. पेट्रोलच्या अन्यायकारक दरवाढीवरुन तृणमूल काँग्रेस आणि डीएमके या पक्षांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.
 
युपीए सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी दिलीच नव्हती असा यूटर्न डीएमकेचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी मारलाय. पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावरुन सकाळीच करुणानिधी यांनी सरकारला इशारा दिला होता याशिवाय  दरवाढीविरोधात डीएमकेनं रस्त्यावर उतरुन आंदोलनही सुरु केलं होतं.
 

First Published: Thursday, May 31, 2012, 14:57


comments powered by Disqus