Last Updated: Tuesday, December 6, 2011, 06:29
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली महाराष्ट्रात मराठीची गऴचेपी करण्याचे काहींनी धोरण अवलंबल्याने राजकीय नेत्यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला. आता तर हिंदी भाषेला दुय्यम स्थान देण्याचं धोरण अवलंबलेले जात आहे. केंद्र सरकारने हिंदी- इंग्लिशचं क्लोन करून 'हिंग्लिश' अपत्य जन्माला घातले आहे.
'हिंग्लिश'ला आता थेट केंद्र सरकारनेच अप्रत्यक्ष मंजुरी दिली आहे. अवघड हिंदी' शब्दांच्या जागी 'हिंग्लिश' (हिंदी आणि इंग्लिश) शब्द वापरण्याच्या सूचना गृह खात्याच्या राज्यसभा विभागाने सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळं केंद्र सरकारने हिंदी- इंग्लिशचं क्लोन केल्याचं स्पष्ट झालं आहे. अतिशुद्ध हिंदीमुळे सर्वसामान्यांना संबंधित विषयाची रुची वाटत नाही, असे मतच गृह खात्याने नोंदविले आहे.
अवघड हिंदी शब्दांना पर्यायी असे सोपे इंग्रजी शब्द देवनागरी लिपीमध्ये सरकारी निवेदनात वापरण्यास सुरवात करावी, असे गृह खात्याने म्हटलं आहे. सरकारी कामकाजामध्ये भाषांतरासाठी हिंदीचा वापर करणे कठीण आणि गुंतागुंतीचे ठरते आहे. भाषांतरात पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर तातडीने सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
भाषांतरातून मूळ मुद्द्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. प्रत्येक शब्दाचा हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे, असा खुलासा या खात्याने केला आहे. लोकप्रिय उर्दू, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांतील शब्दांचा सरकारी पत्रव्यवहारामध्ये वापर वाढविला पाहिजे. शुद्ध हिंदीचा वापर साहित्यामध्ये ठीक आहे; तथापि प्रत्यक्षातील कामासाठी 'मिक्स्ड' भाषेचा वापर व्हावा, अशी अपेक्षाही सरकारने व्यक्त केली आहे.
लोकप्रिय इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द वापरण्याऐवजी तेच शब्द देवनागरी लिपीमध्ये वापरणे अधिक योग्य आहे, असे सांगून 'प्रत्याभूती' सारख्या क्लिष्ट शब्दाला 'गॅरेंटी', 'कुंजीपटल' या शब्दाला 'कीबोर्ड', 'संगणक'ऐवजी 'कॉम्प्युटर' शब्द वापरावा, अशी उदाहरणे गृह खात्यातील सरकारी भाषा विभागाने दिली आहेत
First Published: Tuesday, December 6, 2011, 06:29