नव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट? - Marathi News 24taas.com

नव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट?

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीला पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर सव्वा दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. सध्या रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा बोजा पडणार आहे. देशातल्या इंधन कंपन्यांची यासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीनंतर पेट्रोल दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
 
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीचा खिसा हलका होणार आहे. पेट्रोल सव्वा दोन रुपयांनी महागण्याची दाट शक्यता आहे. इंधन कंपन्यांच्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय होणार आहे. या दरवाढीला यावेळी निमित्त मिळालंय ते रुपयाच्या अवमूल्यनाचं. रुपया घसरत असल्यामुळे जास्त किमतीनं पेट्रोल आयात करावं लागतं आहे. त्यामुळे लीटरमागे जवळपास दोन रुपयांचा तोटा पेट्रोल कंपन्यांना होतो आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.
 
पण त्याचवेळी पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता खरंच पेट्रोलचे दर वाढवणं कितपत शक्य आहे, याबद्दलही संशय आहे. वाढत्या किमतींमुळे निर्माण होणारा असंतोष सरकारचं चांगलंच नुकसान करणारा ठरणार आहे.
 
 

First Published: Monday, January 2, 2012, 08:52


comments powered by Disqus