Last Updated: Tuesday, February 21, 2012, 08:05
www.24taas.com, लखनऊ आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविरोधात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. यामुळे कानपूरमधील त्यांचा रोड शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सोमवारी महाशिवरात्र असल्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवू नये यासाठी २० किलोमीटरच्या मार्गाची परवानगी राहुल गांधी यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करून हा रोड शो केला, असे जिल्हाधिकारी हरी ओम यांनी म्हटले आहे. याप्रकरणी ओम म्हणाले, सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेला हा रोड शो दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होता; तसेच दिलेल्या परवानगीपेक्षा ३८ किलोमीटर लांब हा रोड शो गेला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या रोड शोचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, कानपूरमधील एका मुस्लिम गटाने राहुल गांधी यांच्या शोला काळे झेंडे दाखविले. राहुल यांनी तातडीने कानपूरमधून निघून जावे, अशा घोषणाही या युवकांनी दिल्या. कॉंग्रेसच्या रीटा बहुगुणा जोशी रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. या रोड शोमध्ये कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
First Published: Tuesday, February 21, 2012, 08:05