भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा - Marathi News 24taas.com

भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा

www.24taas.com, नवी दिल्ली
 
केंद्रातील 14 भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. आम्ही केलेले सर्व आरोप खरे असून आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा. असंही अण्णा हजारेंनी सांगितलं.
 
आमच्याकडं या मंत्र्यांच्या भ्रष्ट प्रकरणांचे पुरावे उपलब्ध असल्यानं याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनी केलीय. दिल्लीतल्या जंतर मंतर इथे 25 मार्च रोजी  अण्णांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणावेळी अरविंद केजरीवाल यांनी 14 भ्रष्ट मंत्र्यांची नावे जाहीर करुन पुरावे असल्याचं सांगितलं होतं.
 
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर एफआयआर दाखल करा नाहीतर १५ ऑगस्टपासून देशभरात जेलभरो आंदोलनला सुरुवात करू असा निर्वाणीचा इशारा अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. अण्णा हजारे यांना आज नवी दिल्लीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले त्याची सांगता करताना ते बोलत होते. देशात लोकशाही आणण्यासाठीची लढाई असल्याचं अण्णांनी सांगितलं.
 
भ्रष्टाराच्या विरोधातील लढाईत बाबा रामदेव आणि आम्ही एकमेकांसोबत लढू असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत. याचाच अर्थ आता टीम अण्णा तसंच बाबा रामदेव यांची ताकद एकवटण्याची शक्यता आहे.
 
अण्णा हजारे म्हणाले की मंत्र्यांना जेलमध्ये पाठवणं शक्य आहे. आजवर मी सहा मंत्र्यांची विकेट घेतली आहे आणि अजून अनेकांची घ्यायची आहे. तसंच जनलोकपाल विधेयक संमत झालं तर भ्रष्टाराचाला आळा बसेल. देशात २०१४ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आमचं लक्ष्य असेल असं सूचक वक्तव्य अण्णांनी करत केंद्र सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे.
 
राईट टू रिजेक्ट म्हणजेच मतदानाच्या वेळेस नकाराधिकार मिळाला पाहिजे याचा पुनरुच्चार अण्णांनी यावेळी बोलताना केला. 'देशाला राजकारण्यांनी लुटलं आहे. आता देशाच्या मालकांना जागा आली आहे. जनतेने जागरुक राहिले पाहिजे. आता दिल्ली निवडणुकीसाठी तयारी करणार. कर्जाचे व्याज देण्यासाठी देशाला परत कर्ज घ्यावे लागत आहे.' असं सांगत अण्णांनी सरकारविरोधात एलगार केला आहे.
अण्णांनी आपल्या भाषणात लालू प्रसाद यादवांची खिल्ली देखील उडवली.
 
 
 

First Published: Wednesday, March 28, 2012, 15:22


comments powered by Disqus