महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन Monsoon arrives in Maharashtra

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

येणार येणार म्हणत अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालंय. काल उत्तर कर्नाटकात दाखल झालेल्या मान्सूननं दोन दिवस आधीच राज्यात धडक देऊन दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला सुखद धक्का दिलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या साता-यात आणि कोकणातल्या हर्णे बंदरावर मान्सूनच्या सरी बरसल्या.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातल्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्यानं गारवा निर्माण झाला होता. मात्र सर्वच जण चातकासारखी वाट पाहत होते ती मान्सूनच्या सरींची. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या काही भागात मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली. गेले कित्येक दिवस उकाड्यानं हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना यामुळ चांगलाच दिलासा मिळाला. पण अचानक आलेल्या पावसामुळ अनेकांची धांदल उडाली. बच्चे कंपनीनं मात्र पावसाचा चांगलाच आनंद लुटला. मान्सून महाराष्ट्रात पोहोचलाय. आज, उद्याकडे तो पुण्यात दाखल होईल.पुण्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलीय. दुपारच्या सुमाराला जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसानं पुणेकरांची थोडीशी धांदल उडवली. पण तरीही पुणेकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं दोन बळी घेतलेत. निफाड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसात चितेगाव फाटामध्ये वीज कोसळून १ जण ठार तर धारणगावात भिंत कोसळून सहा वर्षांच्या करण सोनावणेचा मृत्यू झाला.

नैऋत्य मौसमी वा-यांचा वेग आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळं यंदा दोन दिवस अगोदर मान्सूननं रत्नागिरीतल्या हर्णे पर्यंत धडक मारली. गेल्या 24 तासात कर्नाटक आणि गोव्यामध्ये दमदार पाऊस पडत असून गोव्यात आत्तापर्यंत सर्वाधिक 102 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पुढच्या चोवीस तासात मान्सून मुंबईला धडकेल असा अंदाज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013, 20:53


comments powered by Disqus