Last Updated: Thursday, February 16, 2012, 19:55
www.24taas.com, मुंबई राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत दिवसाच्या शेवटी ४५ टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४६ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.
मतदारांची मतदानाकडे पाठ मुंबईत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आलाय.. मुंबईत बहुतांश मतदारांनी मतदानाकडं पाठ फिरवली. दुपारी साडे तीनपर्यंत मुंबईत अवघ्या २९.५१ टक्के मतदान झालंय. तर पुण्यात सुमारे ५०ते ५५टक्के मतदार झालय. पुण्यात त्यामानानं चांगलं मतदान झालंय. नाशिकमध्ये साडेतीन पर्यंत ४३ टक्के मतदान झालं. ठाण्यात तुलनेत चांगला प्रतिसाद होता. साडे तीन पर्यंत ४५ टक्के मतदान झालं. पिंपरी-चिंचवडमध्ये ५५ते ६० टक्के मतदान झालं. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झालं.
ग्रामीण उत्साहात मतदानमहाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या नागपूर, सोलापूर, अमरावती, अकोला आणि उल्हासनगर या पाच महापालिकांसाठीही मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं. अद्याप मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आली नसली तरी साडेतीन वाजेपर्यंतच्या मतदानाच्या टक्केवारीवरुन मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचं दिसून आलं. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात साडेतीन वाजेपर्यंत ४२.१४ टक्के मतदान झालं होतं. सोलापुरात ४६.४७ टक्के, अमरावतीत ४२ टक्के, अकोल्यात ५३ टक्के तर उल्हासनगरमध्ये ३३.२७ टक्के मतदान झालं होतं.
खासदार परांजपेंची सेनवर टीकाठाण्यात महापालिकेसाठी मोठ्य़ा उत्साहात मतदान झालं. सामान्य नागरिक आणि नेत्यांनी सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र शहराच्या सगळ्या भागात दिसून येत होतं. आमदार एकनाथ शिंदे यांनी किसन नगर क्रमांक दोन या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर भागात मतदान केलं. शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला. तसच कुणाकडे सत्ता जाईल हे ठाण्याची जनताच ठरवेल असंही त्यांनी सांगितलं.
हलकी शाई - नाईकांचा आरोपमतदानावेळी वापरण्यात येणारी शाई अत्यंत हलक्या दर्जाची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी केलाय. पूर्वी शाईचा वापर होत होता मात्र आता मार्कर पेनचा वापर केला जातोय. ही शाई रिमूव्हरने पटकन निघून जाते त्यामुळे बोगस व्होटिंगची भीतीही नाईक यांनी व्यक्त केलीय. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
अजित सावंत यांच्यावर हल्लाकाँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते अजित सावंत यांच्यावर मुंबईच्या माहिम भागात हल्ला झाला. चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या माहिम इथल्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर आणि कार्यालयीन कर्मचा-यांमुळं आपण बचावलो असल्याची प्रतिक्रिया अजित सावंतांनी दिली. सदा सरवणकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनीच हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
पोलिसांची धक्काबुक्की - बागवेपुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवेंना पोलिसांनी धक्काबुक्की केलीय. या प्रकरणी बागवेंनी तक्रारही दाखल केलीये. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.60 मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत. तर अविनाश बागवे हे मतदान केंद्राजवळ 100 मीटरच्या आत प्रचार करत करत होते. त्यामुळे त्यांना तेथून बाहेर काढले, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पैशावरून मनसे राडानाशिकच्या पंचवटीत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर पैसे वाटल्याचा आरोप करीत मनसैनिकांनी तोडफोड केलीये. मनसेचे आमदार उत्तमराव ढिकलेंचा मुलगा राहुल ढिकले यांनी ही तोडफोड केलीये. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप ढिकले य़ांनी केलाय. ही माहिती मिळताच ढिकले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी टिळे यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मनसैनिकांनी ऑफीस आणि कार्यालयाची तोडफोड केली. तसचं उमेदवार संजय टिळे यांच्या भावाला आणि कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोपही केलाय.तोडफोडप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय.
अकोल्यात दगडफेक अकोल्यातल्या हरिहरपेठ भागातल्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये काही अज्ञात लोकांनी दगडफेक केलीय. बुथ क्रमांक 305 वर ही दगडफेक करण्यात आलीय. या घटनेनंतर गोंधळ उडाल्यामुळं या बुथवरचं मतदान काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. उमेदवारांच्या अंतर्गत स्पर्धेतून ही दगडफेक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या मतदान केंद्रांवर राज्य सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आलीय.
मतदानाचा हक्क पुण्यातही आता अंतिम टप्प्यातलं मतदान सुरु आहे. पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलाय. पुण्यामध्ये 2996 मतदान केंद्रांवर हे मतदान होतयं. 1,177 उमेदवारांचं भवितव्य पुणेकर मतदार ठरवणार आहेत. खासदार भारतकुमार राऊत यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतकुमार राऊत यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर काल ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रीया करण्यात आली. खंडाळ्याजवळ काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. पण अशाही परिस्थितीत त्यांनी माहिमच्या मतदानकेंद्रापर्यंत येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
बॉलिवूडमध्येही उत्साहबॉलिवूडमध्येही मतादानाचा उत्साह पाहायला मिळाला...जुही चावलाने यंदा पहिल्यांदाच मतदान केलं पण मतदान करायला कधीच उशीर होत नसतो,तुम्हीही मतदान करा असं आवाहन करायला ती विसरली नाही तर शक्ती कपूरने देखील मतदानाचा हक्क बजावला..इतकंच नाही तर मुंबईची परिस्थिती सुधारावी यासाठी मुंबईकरांनी मतदान करावे अशी कळकळीची विनंती केली.
मतदानाचा उत्साह सेलब्रिटींमध्येही दिसून आला. काही सेलिब्रिटींनी शुटींगला जाण्याआधीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही चुनाभट्टीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर लहानपणी राहत असलेल्या चुनाभट्टीचा म्हणावा तितका विकास झाला नसल्याचं मत व्यक्त केलं. मतदानाचा हक्क बजावण्यात आपले बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेनेही आपला मतदानाचा हक्क बजावला. तर गायक कैलाश खेर आणि अभिनेता अनुपम खेर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान करण्याचं आवाहन केलं.
सेलिब्रिटी देव फॅमिलीनेही मतदानाचा हक्क बजावला. जुहूमध्ये अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभनय देव आणि अभिनेत्री सीमा देव यांनी आवर्जून मतदान केलं.अभिनेते रमेश देव शूटींगच्या निमित्ताने गोव्याला गेल्यामुळे ते मतदानाला उपस्थित राहु शकले नाहीत मात्र सर्वानी मतदान केलं पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे असा संदेश देव फॅमिलीने दिलाय.
'
मतदान न करणा-यांवर गुन्हा दाखल करा'दादर भागात अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी मतदान केलं. तर दादर भागात अभिनेता अतुल परचुरे आणि त्यांची पत्नी कोरिओग्राफर सोनीया परचुरे यांनीही मतदान केलं. मतदान केल्यानंतर आता आमचं काम झालं. पण निवडून दिलेल्या नगरसेवकांनी आता त्यांचं काम करावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. पार्ल्यामध्ये अभिनेते विक्रम गोखले यांनीही मतदान केलं आणि मतदान न करणा-यांवर गुन्हा दाखल करावा असं मतही व्यक्त केलं.
जुहू भागात अभिनेत्री शोभा खोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. गोरेगावमधल्या बिंबिसार नगरमध्ये पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, नंदू माधव, राजन ताम्हाणे, सोनाली पंडित यांनी एकत्र येऊन मतदान केलं. सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच कवी गुलजारही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या वांद्र्याच्या मतदान केंद्रावर आले मात्र मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क न बजावताच घरी परतावं लागलं. हे नेहमीचच आहे अशा स्पष्ट शब्दात गुलजार यांनी आपला राग व्य़क्त केला.
First Published: Thursday, February 16, 2012, 19:55