Last Updated: Thursday, March 22, 2012, 14:38
www.24taas.com, मुंबई महाराष्टू राज्यातल्या २६ पैकी १३ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद मिळवत राष्ट्रवादीनं वर्चस्व राखल आहे. काँग्रेसला सात जिल्हा परिषदा मिळाल्यात. ठाणे आणि औरंगाबादेत मनसेच्या मदतीनं आघाडीनं सत्ता मिळवलीय. तर विदर्भात राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देत युतीसोबत हातमिळवणी केलीय. राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातल्या २७ पैकी २६जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडीचे निकाल काहीसे धक्कादायक असेच लागले. राष्ट्रवादीनं २६ पैकी १३ जिल्हा परिषदांत अध्यक्षपद मिळवत, आपलाच पक्ष राज्यात नंबर एकचा पक्ष असल्याचं दाखवून दिलय. ठाण्यात मनसेच्या मदतीनं राष्ट्रवादीनं अध्यक्षपद मिळवलं. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीनं सत्ता पुन्हा आपल्या हातात ठेवली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंना दणका देत जिल्हा परिषद ताब्यात घेतलीय. तर विदर्भात चार ठिकाणी शिवसेना-भाजपसोबत जात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झालीय. हा काँग्रेसला मोठा धक्का मानण्यात येत आहे.
काँग्रेसकडून डावलण्यात येत असेल, तर जिल्हा परिषदेत वेगळी समीकरणे दिसतील, असा इशारा पवारांनी नुकताच दिला होता. तर सत्ताधारी आघाडीतील प्रमुख असलेल्या काँग्रेसला 7 जिल्हा परिषदांवर समाधान मानावं लागल आहे. औरंगाबादेत मनसेच्या मदतीनं काँग्रेसला अध्यक्षपद मिळालं, तर लातूरमध्ये विलासराव देशमुख, नांदेडात अशोक चव्हाण, तर सिंधुदुर्गात नारायम राणेंनी सत्ता राखलीय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि विदर्भात वर्धा, बुलढाण्यातच काँग्रेसला अध्यक्षपद मिळू शकलं आहे.
विदर्भात राष्ट्रवादीनं दिलेल्या धक्क्यानं काँग्रेस नाराज झाली आहे.राष्ट्रवादीची भूमिका दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर या संधीसाधू आघाड्यांवर राजकीय नेत्यांची सोयीस्कर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडं शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीनं ६ जिल्हा परिषदांवर वर्चस्व मिळवलय. यात मराठवाड्यात हिंगोली आणि जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं असल्यानं त्यांचाच अध्यक्ष निवडून आला. तर जळगावात सुरेश जैन यांना बाजूला सारुन शिवसेना आणि भाजप एकत्र आले. तर विदर्भात राष्ट्रवादीच्या मदतीनं भाजपनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदा ताब्यात घेतल्यात. कोकणात रायगड जिल्हा परिषद महायुतीला मिळाली.
First Published: Thursday, March 22, 2012, 14:38