Last Updated: Friday, January 3, 2014, 11:16
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोलापूरमध्ये निवासी डॉक्टराला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड बेमुदत संपावर गेलीय. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन केलं असलं तरी मार्डने संपाची भूमिका कायम ठेवलीय.
३१ डिसेंबरच्या रात्री सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ३ पोलिसांनी एका निवासी डॉक्टराला मारहाण केली... या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत निवासी डॉक्टरांची संघटना `मार्ड` बेमुदत संपावर गेलीये. संपाचा पहिला दिवस संपत असतानाच मारहाण करणा-या पोलिसांचं निलंबन केल्याची घोषणा सोलापूरच्या पोलिस आयुक्तांनी केली. मात्र मार्ड केवळ निलंबनावर समाधानी नाही... त्यांना २०१० साली झालेल्या डॉक्टर संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई हवी आहे...
या कायद्यानुसार आरोपीला तातडीनं अटक करावी लागते. हा अजामिनपात्र गुन्हा ठरवला जातो तसंच गुन्हेगाराला ५ वर्षापर्यंत शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.या राज्यव्यापी संपात ४००० निवासी डॉक्टर सहभागी झालेत. मुंबईतल्या जेजे, नायर, केईएम आणि सायन या मोठ्या रुग्णालयांमधले दीड हजार डॉक्टर्सही संपावर आहेत. याचा रुग्णांना फटका बसतोय. अनेक ठिकाणी ओपीडी आणि शस्त्रकीया पुढे ढकलाव्या लागल्यात.
रुग्णांच्या या अनावश्यक हालांची जबाबदारी कुणाची ? खरंतर मार्डनं १ जानेवारीलाच वैद्यकीय शिक्षण खातं आणि गृहखात्याला संपाची नोटीस पाठवली होती. मात्र त्याकडे लक्ष देणं या दोन्ही खात्यांना महत्त्वाचं वाटलं नाही. गुरूवारी निवासी डॉक्टर्स संपावर गेल्यानंतर त्या तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं. कारवाई करायचीच होती, तर ती आधी का केली नाही, असा प्रश्न आहे. आता मार्ड डॉक्टर संरक्षण कायद्याअंतर्गतच कारवाईसाठी अडून बसली आहे..
सोलापूरच्या स्थानिक प्रकरणासाठी संपूर्ण राज्यातल्या जनतेला वेठीला धरून मार्डही अतिरेक करत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे... गृहखात्याचा ढिसाळपणा. मार्डची ताठर भूमिका आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतलेली बघ्याची भूमिका या सगळ्यात भरडला जातोय तो मात्र सर्वसामान्य माणूसच... याला या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यापलिकडे हा सामान्य माणूस काहीच करू शकत नाही, यामुळे या सगळ्यांचंच फावलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 3, 2014, 11:16