न्यू शंकरलोक इमारत दुर्घटनेत ७ ठार, ५ जखमी, A seven-story residential building collapsed in Mumbai

न्यू शंकरलोक इमारत दुर्घटनेत ७ ठार, ५ जखमी

न्यू शंकरलोक इमारत दुर्घटनेत ७ ठार, ५ जखमी
www.zee241taas.com, झी मिडीया, मुंबई

मुंबईतल्या वाकोल्यात न्यू शंकरलोक ही सात मजली इमारत आज सकाळी साडे आकराच्या सुमारास बाजूच्या कॅतरीन चाळीवर कोसळली. या दुर्घटनेत एकूण सात ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यातून ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून मदतकार्य सुरूच आहे.

सुधा श्रीधरन (३२), रश्मी अनिल पारधे (३८), आदित्य पारधे (७), आयुद पारधे (५), श्रद्धा पारधे (७०), लुईस नानीज (६०), चंदन बहन पटेल (४५) या सात जणांचा मृत्यू झाला आहे. अक्षय केसकर (१८ ), सीता केसकर (६०), रोहिणी जगताप (४७), सत्यम पटेल तसेच अन्य एक जण जखमी झालाय. त्याचे नाव समजू शकलेले नाही.

स्थळ - यशवंत नगर, वाकोला, सांताक्रूझ. वेळ - सकाळी ११.३० ची. न्यू शंकरलोक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सुदैवानं धोकादायक म्हणून जाहीर झालेली ही इमारत बहुतांश रिकामी होती. तिथं २-३ कुटुंबंच राहात होती. पण दुर्दैव असं की इमारत बाजुच्या राहत्या चाळीवर कोसळली. चाळीमध्ये तब्बल २२ कुटुंबं वास्तव्यास होती. यातल्या २० घरांवरच ही सात मजली इमारत कोसळली आणि एकच हल्लकल्लोळ माजला..

दुर्घटना दिवसा घडल्यामुळे चाळींमधले अनेक जण कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे जीवितहानी कमी झाली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असती, तर मृतांचा आकडा मोठा झाला असता. १९८० साली बांधलेली ही इमारत २००७साली धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर इमारत जवळजवळ रिकामी करण्यात आली.

मात्र संध्या श्रीधरन यांनी इमारत पाडण्याच्या कामाला कोर्टातून स्थगिती आणली होती आणि काही झाल्यास जबाबदारी आपली असेल, असं कोर्टाला सांगितलं होतं. दुर्दैवी योगायोग असा की संध्या यांची बहीण सुधा यांचा या दुर्घटनेत बळी गेलाय.

स्थानिक नगरसेविका सुनयना पोतनिस यांनी संध्या श्रीधरन आणि महापालिका जबाबदार असल्याची टीका केलीये. तर महापौर सुनील प्रभू यांनी महापालिकेची जबाबदारी तातडीनं झटकलीये. या घटनेमुळे केवळ धोकादायक इमारतीच नव्हे, तर त्यांच्या आसपास असलेल्या अन्य इमारतींचा प्रश्नही प्रकर्षानं समोर आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 21:52


comments powered by Disqus