Last Updated: Wednesday, October 10, 2012, 17:52
www.24taas.com,मुंबई हक्काच्या घरासाठी गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरलेत. मुंबईतल्या गिरणी कामगारांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढलाय. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं कधी मिळणार? असा सवाल या कामगारांनी उपस्थित केलाय.
गिरणी कामगारांना एक लाख घरे देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला.यात राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, गिरणी चाळ रहिवाशी संघर्ष समिती, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच या संघटना सहभागी झाल्यात. तर या मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील कामगार सहभागी झाले होते.
सरकारनं गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी ठोस धोरण ठरवावं, अशी मागणी गिरणी कामगारांनी केलीय. ठोस निर्णय होईपर्यंत आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांनी केलाय. म्हाडाच्या लॉटरीत लागलेली घरं गिरणी कामगारांच्या ताब्यात केव्हा मिळतील, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय.
First Published: Wednesday, October 10, 2012, 17:40