Last Updated: Wednesday, February 27, 2013, 16:25
www.24taas.com, मुंबईगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत मैत्री वाढविली, तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरुच ठेवली तर ठार करू, असं धमकीचं पत्र रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना आले आहे. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेकडून हे पत्र पाठविण्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
मुकेश अंबानी यांना रविवारी हे पत्र मिळाले. अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या बहुमजली इमारतीला उद्धवस्त करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
मुंबईत नरिमन पॉइंट येथील मुकेश अंबानी यांच्या मेकर चेंबर ऑफीसमध्ये रविवारी दुपारी एका कर्मचाऱ्याच्या हातात अज्ञात व्यक्तीने हे पत्र दिले. कागदावर इंग्रजी भाषेत हाताने हे पत्र लिहिण्यात आले आहे. इंडियन मुजाहिदीनच्या सदस्याने हे पत्र लिहिले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अटकेत असलेला इंडियन मुजाहिदीनचा सदस्य अतिरेकी दानिश याची सुटका करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे. अतिरेकी दानिशची सुटका न केल्यास देशातील सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांना याची शिक्षा भोगावी लागेल, असाही धमकीचा मजकूर या पत्रात देण्यात आला आहे.
अंबानी यांनी मोदी यांना पाठिंबा देऊन अल्पसंख्यकांच्या भावना दुखावल्या आहेत. `अँटिलिया` या इमारतीची मूळ जागा वक्फ बोर्डच्या मालकीची होती. परंतु अंबानी यांनी ती हडपली, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
रिलायन्स कंपनीचे काही अधिकारी मला येऊन भेटले. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे याचा तपास सोपविण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
First Published: Wednesday, February 27, 2013, 16:25