Last Updated: Friday, March 15, 2013, 14:18
www.24taas.com, मुंबई राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.
चालू हंगामात राज्यात झालेल्या ऊस गाळपाची आकडेवारी हेच सांगतेय. त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात धूळ टाकून उसाला पाणी दिलं गेलंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटण्याऐवजी तब्बल १२५ लाख मेट्रिक टनानं वाढलंय. त्यामुळं राज्यात खरंच दुष्काळ आहे का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अडसाली आणि फुले २६५ या जातीच्या ऊसाचं वाढलेले उत्पादन आणि जास्त दर यामुळे शेतकऱ्यांनी जास्त ऊस लावला असावा, अशी कारणं वाढीव उस उत्पादनासाठी दिली जात आहेत.
दुसरीकडं दुष्काळी जनतेला टाळून, पाण्याचे पाट ऊसाच्या मळ्यांकडे वळवले गेले का? असा देखील प्रश्न पुढं आलाय. कारण, राज्यात १६८ पैकी ६१ कारखाने खाजगी मालकीचे आहेत. एव्हढं उत्पादन होऊनही साखर कारखानदार मात्र खूश नाहीत. कारण साखरेच्या दराची भीती त्यांना सतावतेय.
First Published: Friday, March 15, 2013, 14:17