Last Updated: Tuesday, March 12, 2013, 16:17
www.24taas.com, मुंबईमनसे आमदार राम कदम यांनी आपण चीनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राम कदम गैरहजर होते. शिवाय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही ते गैरहजर आहेत. त्यामुळं राज ठाकरेंचा `राम` गेला कुणीकडे असा सवाल उपस्थित केला जात होता. राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. अखेर राम कदम यांनी आपल्या शाळेतील मित्रांची परिस्थिती गंभीर असल्याने चीनमध्ये आलो असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया ‘झी 24 तास’कडे दिली आहे.
राज ठाकरेंच्या परवानगीनेच आपण चीनमध्ये गेल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय विरोधक खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनी मनसेचे मुंबईतील सगळे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी षष्मुखानंद सभागृहात उपस्थित असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला होता.
कदम यांच्या अनुपस्थितीची दखल खुद्द पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घेतली होती. कदमांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते तरी कदम हे सोमवारी उपलब्ध होतील असा दावा मनसेचे विधिमंडळ गटनेते बाळा नांदगावकर यांनी झी 24 तासशी खास बोलताना केला होता.
First Published: Tuesday, March 12, 2013, 16:16