टोल फोडचा मनसेला भरावा लागणार ‘मोल’, mns will pay toll plaza for agitation

टोल फोडचा मनसेला भरावा लागणार ‘मोल’

टोल फोडचा मनसेला भरावा लागणार ‘मोल’

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टोल वसुलीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये टोलनाक्यांवरील पावणेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संबंधित मनसे कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

२६ जानेवारीच्या मध्यरात्री मुंबई उपनगर जिल्हा हद्दीतील ऐरोली आणि आनंदनगर येथील टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वसुली बंद पाडली होती. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ऐरोली टोलनाक्यावर एक लाख १७ हजार रुपये, तर आनंदनगर टोल नाक्यावर दोन लाख ६४ हजार असे एकूण तीन लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात पुष्कर विचारे, संदीप पाचंगे, विक्रांत अडसुळे, मनोज ठाकूर आणि भिकाजी चौधरी यांना आरोपी करण्यात आले होते.

कायद्यानुसार मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांकडून नुकसानभरपाई करून घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींकडून नुकसानभरपाई का वसूल करू नये याची कारणे दाखवा नोटीस या कार्यकर्त्यांना बजावण्यात आली आहे. याप्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

या सुनावणीस कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे असेही त्यांना कळविण्यात आले आहे. लेखी खुलासा न केल्यास नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असा इशाराही या नोटीशीत देण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 16:01


comments powered by Disqus