Last Updated: Friday, November 22, 2013, 10:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.
इमारतीची ही दुरावस्था पाहिल्यानंतर इथं कुणीही राहत नसेल असं वाटत असेल. परंतु याठिकाणी गिरणी कामगारांची १२० कुटुंबं अक्षरश: जीव मुठीत घेवून जगतायत. चुनाभट्टी इथल्या स्वदेशी मिल कंपाऊंडच्या टाटानगर वसाहतीची ही इमारत आहे. २००२ मध्ये स्वदेशी मिल बंद पडली आणि या वसाहतीची वाताहात सुरु झाली. तडा गेलेल्या भिंती, बाधरुममध्ये टपकणारं पाणी आणि नजर जाईल तिथं दिसणारा सळ्यांचा सांगाडा. गॅलरीची अवस्था तर न सांगण्यापलिकडं. अशा गॅलरीतून प्रत्येकाला आपल्या घरात जावं लागतं. मागील वर्षी एक तरुण तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला होता. हायकोर्टाच्या आदेशान्वये लिक्विडेटरच्या अखत्यारीत ही जागा आहे आणि लिक्विडेटर ना इमारतीच्या दुरुस्तीला परवानगी देतोय ना पुनर्विकासाला.
धक्कादायक म्हणजे लिक्विडेटरनं मुंबई महापालिकेला या वसाहतीला कुठल्याही मुलभूत सुविधा पुरवू नयेत असा आदेश दिलाय. त्यामुळं या वसाहतीतील रहिवाशांना अनेक गैरसोयींना सामारं जावं लागतंय. फुटलेल्या मल:निसारण वाहिन्या, तुंबलेल्या गटारी, घाणीचं साम्राज्य यामुळं रोगराई तर पाचवीला पुजलेली. दहा दिवसांपूर्वीच या वसाहतीतील एका तरुणाचा मलेरियामुळं मृत्यू झाला आहे.
मिलच्या जागेत राहत असल्यानं गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांच्या लॉटरीसाठीही या गिरणी कामगारांना अपात्र ठरवलंय. मिल बंद पडल्यानं नोकरी गेली, थकलेली देणीही मिळाली नाहीत आणि आता तर राहतं घर सोडण्यासाठी येत असलेला दबाव. इमारत कोसळून जीव जाण्याअगोदर न्यायदेवता यातून मार्ग काढेल एवढीचं आशा इथले रहिवाशी बाळगून आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 10:27