Last Updated: Wednesday, April 17, 2013, 19:14
www.24taas.com, मुंबईअनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात उद्याच्या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांना स्थानिक नगरसेवक आमदारांचा पाठिंबा असल्याची टीका राज यांनी केलीय.
अधिका-यांचं निलंबन होतं, पण या लोकप्रतिनिधींवर कारवाई का होत नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय. मनसेचे नगरसेवक सहभागी असतील, तर कारवाई करु असंही त्यांनी स्पष्ट केलय. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
ठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डर सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. राजकीय आणि अधिकाऱ्यांच्या लागेबंधमुळे बिल्डर मोकाट आहे. हे बिल्डर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी राज यांनी पत्रकार परिषदेत केली.
अनिकृत बांधकामात मनसेच्या नेत्याचा तसेच नगरसेवकांचा समावेश असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा. मतांसाठी अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन मिळत आहे. ठाण्यातील बंदमागे राजकारण केले जात आहे. अनधिकृत बांधकामाला आपण थारा देत नाही. त्यामुळे या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा राहणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. यावेळी शरद पवारांवर राज यांनी टीका केली. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, मात्र, काळ सोकावतोय, असे राज पवारांबाबत बोलले.
ठाणे बंदची हाक ठाणे शहरातील सरसकट सर्वच अनधिकृत इमारतींवर कारवाई करू नये या मागणी करता गुरुवारी सर्वपक्षीयांकडून ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. शीळफाट्याच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील अनधिकृत, धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींवर कारवाई सुरु केलीय.
या कारवाईमुळे सुमारे दहा लाख लोकं रस्त्यावर येतील. त्यामुळे या लोकांचं पुनर्वसन करा या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्याकरता ठाण्यातील सर्वपक्षीय नेते एकटवले असून १८ एप्रिलला ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच या नंतरही यावर तोडगा न निघाल्यास ठाणे ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा इशारा सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
बंद विरोधात जनहित याचिका अनधिकृत बांधकामांवरच्या कारवाईविरोधात उद्या पुकारण्यात आलेल्या बंदविरोधात जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना या पक्षांनी उद्या ठाणे बंद पुकारलाय. हा ठाणे बंद बेकायदेशीर ठरवण्यात यावा, ज्या पक्षांनी बंद पुकारलाय त्यांना दंड आकारण्यात यावा, अनधिकृत बांधकाम हटवताना विरोध करणारे राजकीय नेते आणि इतरांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा, असं या याचिकेत म्हणण्यात आलंय. ऍलर्ट सिटीझन ऑफ ठाणे सिटी या संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आलीय.
First Published: Wednesday, April 17, 2013, 19:04