Last Updated: Saturday, September 29, 2012, 15:12
www.24taas.com,मुंबईमुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेतला. रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीचा मुंबईकरांना प्रत्येक वर्षी फटका बसणार आहे. वर्षातून एकदा मे महिन्याच्या पहिल्या तारखेस भाडे सुधारणा करण्याची हकीम समितीची शिफारस शासनाकडून मान्य करण्यात आली.
सरकारच्या या भाडेवाढीच्या निर्णयावर मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अंतिम निर्णय घेणार आहे. रिक्षा-टॅक्सीचे भाडे ठरवण्यासाठी परिवहन विभागाने डॉ. हकीम यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली होती. त्यानुसार त्यांनी तयार केलेल्या भाडेवाढीच्या सूत्रानुसार सरकारने रिक्षाला पहिल्या टप्प्यासाठी १२ रुपयांच्या मूळ भाड्यात दोन रुपयांची वाढ करून १४ रुपये एवढे केले आहे, तर टॅक्सीच्या मूळ भाड्यात १ रुपयाची वाढ करून १८ रुपये एवढे केले आहे.
दरम्यान, रात्री १२ ते ५ या वेळेतील प्रवासाच्या भाड्यात मूळ भाड्याच्या ३० टक्के वाढ देण्याची शिफारस हकीम समितीने केली होती. सरकारने ती फेटाळत पूर्वीप्रमाणेच मूळ भाड्याच्या २५ टक्केच भाडे रात्र प्रवासासाठी आकारावे असे स्पष्ट केले. तर पंधरा-वीस वर्षे वयाच्या जुन्या पद्मिनी टॅक्सी सध्या मेकॅनिकल मीटरवर चालत आहेत. त्यामध्ये तत्काळ बदल करून ई-मीटर बसवावेत असे सरकारने स्पष्ट केले आहे.
First Published: Saturday, September 29, 2012, 15:12