कॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस..., second day of action on campa colo

कॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...

कॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय. मोठं घर सोडून भाड्याच्या लहान घरांमध्ये राहण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आलीय.

कॅम्पा कोला कंपाऊंडमधील बी वाय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कमल पारीख घर वाचवण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपवास करतायत. गेल्या दीड वर्षापासून सर्व प्रकारचे प्रयत्न थकल्यानंतर अखेर त्यांच्या घरातील वीज, गॅस आणि पाणी तोडण्यात आलंय. पती आणि दोन मुलांसह गेल्या 24 वर्षांपासून त्या इथं राहतात. ज्या घरामध्ये सर्व सण समारंभ, मुलांचे वाढदिवस आनंदात साजरे केले, ते घर अशाप्रकारे सोडणं त्यांना अशक्य होतंय. सुमारे 2300 स्क्वेअर फूट असलेलं भलंमोठं घर सोडून त्यांना आता वरळीतच भाड्यानं घेतलेल्या 800 स्क्वेअर फुटांच्या घरात राहावं लागणार आहे. मोठ्या मुलाचे लग्नाचं वय झालं असलं तरी आता घरच नसल्यामुळं त्याचं लग्न करणं अवघड जात असल्याचं त्या सांगतात.

कॅम्पा कोला कंपाऊंडमधीलच पटेल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निर्मला शहा यांचीही तीच स्थिती आहे. पती, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असलेल्या निर्मला शहा गेल्या 23 वर्षांपासून इथं राहत आहेत. त्यांना तर घर वाचण्याची एवढी आशा होती की, त्यांनी अद्याप भाड्यानं दुसरे घरही पाहिलेलं नाही. जे काही साहित्य आहे ते बहिणीच्या घरी ठेवलं आहे. वीज, पाणी, गॅस तोडलं तरी त्याच फ्लॅटमध्ये राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. कमल पारीख यांच्याप्रमाणं त्यांनाही राहतं घर जाणार असल्यानं आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता लागलीय.

ही स्थिती केवळ या दोन कुटुंबांची नाही तर घर तोडलं जाणाऱ्या कॅम्पा कोलातील सर्वच कुटुंबांची आहे. घरांवर हातोडा पडण्याची कारवाई अद्याप सुरु झाली नसल्यानं अद्यापही त्यांना घरे वाचण्याची आशा आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 24, 2014, 08:50


comments powered by Disqus