‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’ - Marathi News 24taas.com

‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’


www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतल्या अपूर्ण कामांवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर जबाबदारी ढकलत आहेत.
 
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एमएमआरडीएच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएच्या अंतर्गत सुरु असलेल्या मोनो रेल्वे आणि मेट्रो रेल्वेच्या कामाची त्यांनी पाहणी केली. पी.डिमेलो रोड, शिवडी, वडाळा तसंच मुंबईतील इतर ठिकाणी एमएमआरडीएची कामं कशा पद्धतीनं सुरु आहेत याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
 
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु असलेल्या कामांमुळं सामान्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहतुकीचाही मोठा खोळंबा होतो.. ही कामं पालिकेची नसून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात येणा-या एमएमआरडीकडून सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.
 
ईस्टर्न फ्री वे, मोनो आणि मेट्रो प्रकल्पांची पाहणी केली असून आणखी काही प्रकल्प पाहायचे आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दुसरीकडे मुंबईतील वाहतूकीची कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोडवर भर देणार असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितलंय.
 

First Published: Tuesday, June 12, 2012, 14:26


comments powered by Disqus