मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन - Marathi News 24taas.com

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

 www.24taas.com, मुंबई
 
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर  स्पष्ट केलय.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. कॅबिनेटच्या तातडीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मीडियासमोर दाखल झाले होते.  यावेळी या बैठकीत सगळ्या मंत्र्यांचे परदेश दौरे केले रद्द केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसचं सव्वा दोन लाख फाईल्स स्कॅन केल्या आहेत, आणि त्या सुरक्षित आहेत. उरलेल्या फाईल्स मात्र सील करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.  आदर्श घोटाळ्यातील फाईल्सही सीबीआयकडे सुरक्षित आहेत, त्यामुळे आदर्श घोटाळ्याच्या तपासावर परिणाम होणार नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलंय. संगणकात असलेली माहिती परत मिळवण्यासाठी टेक्निकल डिपार्टमेंटची मदत घेतली जाईल. सुरक्षा यंत्रणेमध्ये काही त्रुटी होत्या, त्याची चौकशी केली जाणार आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या केबिनला काहीही नुकसान पोहचलं नव्हतं, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. याविषयी विचारलं असता, ‘माझ्या केबिनमध्ये कोणतेही कागदपत्रं नव्हती. केबिनला काहीही नुकसान पोहचलं नाही,' असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शांतपणे दिलं.
 
सध्या कुणालाही मंत्रालयाच्या इमारतीत जाण्याची परवानगी नाही. स्ट्रक्चर ऑडिट पार पडेपर्यंत मंत्रालय बंद राहणार आहे, मात्र प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू करण्याकडे लक्ष दिलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या दुर्घटनेमागे घातपात असल्याच्या शक्यतेवर मात्र मुख्यमंत्र्यांनी ‘नो कमेंट’ची भूमिका घेतली.
 
.
 


 

First Published: Friday, June 22, 2012, 14:36


comments powered by Disqus