Last Updated: Thursday, November 3, 2011, 13:49
झी २४ तास वेब टीम, मुंबई काही फटाके दिवाळीनंतरही बाकी ठेवायचे असतात, असे सांगत दिवाळीला काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांच्यावर भाष्य करणे टाळणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास ‘ठाकरी’ ठेवणीतील कानठळ्या बसविणारे ‘फटाके’ सर्व विरोधकांच्या तंबूत घुसून फोडले.
राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय निरूपम, कृपाशंकर सिंह, उद्धव ठाकरे, उत्तर भारतीय, हिंदी मीडियांचा चांगलाच समाचार घेतला.
दोन हजार मैलावरून येऊन मराठी माणसाला आव्हान देण्याची या भय्यांची हिंमत तरी कशी होते, मुळात संजय निरूपम यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्याची गरज काय आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबई बंद करू, अशी माजोरडी वक्तव्ये सहन करणार नाही.
मराठी माणसाला भडकविणारी विधाने केली आणि मराठी माणूस पेटून उठला तर महाराष्ट्रभर दंगली घडतील. त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कृपाशंकर सिंह, संजय निरूपम यांना वेळीच आवर घालावा, याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी ही राज यांनी यावेळी दिली.
हे निवडणुकीसाठीचे फटाके नाही, ते नंतर....माझी ही पत्रकार परिषद मुंबई महानगरपालिका निवडणूक समोर ठेवून घेत नसून निवडणुकीसाठी योग्य वेळी बोलेन असं म्हणत राज यांनी आपली पत्रकार परिषदेमागील भूमिका स्पष्ट केली. दोन हजार मैलांवरून येऊन मुंबई बंद पाडण्याची भाषा करण्याची हिंमत उत्तर भारतीय नेते करतातच कसे असा प्रश्न विचारत छटपूजेच्या नावाखाली चालू असणाऱ्या राजकारणावर राज यांनी निशाणा साधला. यापुढे जर हे प्रकरण वाढवलं तर मराठी माणूस पेटून उठेल आणि दंगली घडतील अशी धमकीही राज यांनी दिली.
छटपूजेची नौटकी बंद करा-
पाच-सहा वर्षांपूर्वी छटपूजेचं स्वरुप वेगळं होतं. आता मात्र ते बदलून गेलं आहे असं राज म्हणाले. छटपूजेच्या नावाखाली उत्तर भारतीयंचं शक्तीप्रदर्शन चालू असून ही नौटंकी त्यांनी ताबडतोब थांबवावी असा इशाराही राज यांनी दिला. मुळात काही कारण नसताना निरुपमना अशी वक्तव्यं करण्याची गरज काय होती असं विचारत राज यांनी निरुपम हे उद्धवच्याच गळ्यातला ताईत होते य़ा गोष्टीची आठवण करुन दिली. निरुपमसारखी माणसं आधी ‘भाई जी, भाई जी’ करत गरीब बनून येतात. आणि नंतर मराठी माणसावरच उलटतात असा निरुपमवर सणसणीत हल्लाबोल राज यांनी केला.
उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
ही छटपूजा मुंबईत उद्धव ठाकरे यांनीच सुरू केली होती याची आठवण करुन देत राज यांनी उद्धव यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला. ‘दात घशे में घालूंगा’, ही पाहा यांची हिंदी असे सांगून राज यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
निरूपमांना बेडरूममधून बाहेर पडणं मुश्कील करु
ठाकरे बंधूंनी सुरक्षेशिवाय मुंबईत फिरुन दाखवावे या निरुपमच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना राज म्हणाले की, मी सुरक्षा स्वतःहून मागितली नव्हती. मी सुरक्षेविना फिरुन दाखवतो. निरुपम यांनीही फिरुन दाखवावं असं प्रतिआव्हान राज यांनी दिलं. तसंच जर निरुपमनी मराठी माणसाला भडकावलं तर त्याचं घराबाहेरच काय बेडरुमबाहेर पडणंही मुश्कील करुन टाकू असा टोलाही राज यांनी लगावला.
सरकारला इशारा
केवळ मतांच्या राजकारणासाठीच गाड्या भरभरुन उ. भारतीय लोक मुंबईत आणले जातात अशी टीका करताना राज यांनी काँग्रेसलाही टार्गेट करत सरकारने वेळीच अशी बेजबाबदार वक्तव्यं करणाऱ्या उ. भारतीय ‘कुत्र्यांना’ वेळीच आवर घालावा. मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री, गृहमंत्री यांनी वेळीच निरुपम प्रकरणात हस्तक्षेप करावा. जर मराठी माणूस पेटला, तर दंगली घडतील आणि त्याची जबाबदारी सरकारवर आहे असा इशाराही सरकारला राज यांनी दिला.
राज यांनी हिंदी मीडियावर फोडला बॉम्बआजवर राज ठाकरे यांनी नेहमीच मीडियाचा समाचार घेतला आहे. मुख्यतः हिंदी मीडियाला त्यांनी नेहमीच टार्गेट केले आहे. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी मीडियावर चांगलचं तोंडसुख घेतलं, हिंदी भाषिक नेत्यांप्रमाणे हे हिंदी चॅनलवाले सुद्धा नेहमीच गरळ ओकतो, अशा बातम्या चालवतात. ‘हिंदी चॅनलचे अँकर नेहमीच आमच्या भाषणाचा विपर्यास करीत असतात, अत्यंत रंजकपणे आणि विचित्र पद्धतीने माझ्या भाषणाचे भाषांतर करून आपल्या चॅनलवर दाखवतात,’ ‘मी ओकतो ती आग आणि निरूपम आणि कृपाशंकर हे काय मध ओकतात का? ’ या हिंदी चॅनलवाल्यांना एकच सागंण आहे, ‘जर का माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून चॅनलवर बातम्या दाखवल्या तर यापुढे महाराष्ट्रात एकाही हिंदी चॅनलचे कॅमरे दिसणार नाही.’ असा सज्जड दमच राज यांनी भरला.
...तर दंगली घडतीलराज यांनी मुंबई महानगरपालिकेला समोर ठेऊनच काही गोष्टी समोर मांडल्या, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पुन्हा एकदा मराठीच्या विषयाला हात घातला, ‘मराठी माणसाच्या नादाला लागू नका. या निरूपम यांच्या सारख्या लोकांची माजोरडी वक्तव्य सहन केली जाणार नाही.’ आणि जर का अशा प्रकारची वक्तव्ये झाली तर मराठी माणूस पेटून उठेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात दंगली घडून येतील आणि याला जबाबदार सत्ताधारीच असतील. या लोकांना गरज नसताना अशी वक्तव्य करण्याची गरजच का पडते? राज यांनी अतिशय आक्रमकपणे निरूपम, आझमी आणि कृपाशंकर यांना झोडपून काढले.
First Published: Thursday, November 3, 2011, 13:49