Last Updated: Thursday, May 23, 2013, 15:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या उक्तीचा मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकावर प्रत्यय आला. मंगळवारी कुर्ल्याला राहणारे अशोक त्रिवेदी पुण्याला जाण्यासाठी दादरला आले. दादरहून त्यांनी धावपळीत पुण्याला जाणारी इंटरसीटी एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा तोल गेल्यामुळं ते प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये जाऊन पडले... आणि पाहणाऱ्यांच्या धस्स झालं.
वेळ सकाळी ६ वाजून ५५ मिनिटं.... ठिकाण - दादर रेल्वे स्टेशन... प्लॅटफॉर्म नंबर चार... पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस सीएसटीहून दादरला आली. पण ही गाडी थांबण्यापूर्वीच अशोक त्रिवेदी यांनी चढण्याची घाई केली. त्यातच त्यांचा तोल गेला आणि ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडले. ट्रेन सुरूच असल्यानं ट्रेननं त्यांना तब्बल ३० मीटर फरफटत नेलं. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि एकच धावपळ सुरू झाली. अशोक त्रिवेदींना त्या गॅपमधून काढण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शेवटी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि अखेर त्रिवेदींना बाहेर काढलं. अशोक त्रिवेदी अक्षरशः मृत्यूच्या दारातून बाहेर आले. त्यांच्यावर सध्या सांताक्रुझच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाढती गर्दी, धावपळीमुळे रेल्वेस्टेशनवर अपघातांची संख्या वाढतेय. त्यामुळे प्रवाशांनीही शिस्तीनं वागणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे. त्रिवेदी यांच्याबाबतीत ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ही उक्ती सार्थ ठरलीय. पण प्रत्येकाच्याच बाबतीत हे खरं होईल, असं नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 23, 2013, 15:41