Last Updated: Sunday, December 22, 2013, 20:20
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर चंद्रपूरमधील राष्ट्रवादीचे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना वरोरामध्ये ‘डीवायएसपी’ गणेश गावडे यांनी केलेली जबर मारहाण उभ्या महाराष्ट्राच्या समोर आली. मात्र, एवढ्यावरच पोलिसांचं समाधान झालेलं नाही. पोलिसांनी चौकशीचा बहाणा करत मोहोड यांना जिल्हा रुग्णालयातून उचलंल. भद्रावती ठाण्यात भोवळ आलेल्या मोहोड यांना पोलिसांनी नाईलाजाने पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणलं आहे. पोलिसांच्या या कृतीने जिल्ह्यात `पोलीस`राज सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, चंद्रपुरचे डीवायएसपी गणेश गावडे यांनी कामगार नेत्याला केलेली माराहाण अंगलट आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्या जिल्हा बंदची हाक दिलीय. याशिवाय, गावडेंच्या अटकेबरोबर त्यांना निलंबित करण्याची मागणीही नेत्यांनी लावून धरली. यामुळे चंद्रपूरचं वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील काय निर्णय घेतात याकडे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक - एम्टा कोळसा खाणीतील कामगारांच्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत मोहोड यांचा हातही मोडला. दबंग पोलीस उप-अधीक्षक गणेश गावडे यांनी भर चौकात मोहोड यांना केलेली मारहाण राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलीय. या अमानुष कारवाईविरोधात जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी गावडे यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करत निलंबनाची मागणी केली आहे. सोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची मागणीही गृहमंत्र्यांकडे केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास पक्षाच्या वतीने सोमवारी चंद्रपूर बंदचा इशारा देण्यात आलाय.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वातील पोलीस आणि आबांचे कार्यकर्ते यांच्यातील हा संघर्ष पेटला आहे. यामुळे कामगार बहूल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे, वातावरण निवळण्यासाठी आता पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात आबा कसा समेट घडवून आणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 22, 2013, 20:20