Last Updated: Monday, July 29, 2013, 22:10
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकदोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान.... असं घडतंय नाशिकमध्ये.... रिक्षाचालक आणि आरटीओ अधिका-यांमध्ये कारवाईच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल झाले.
सकाळची वेळ.... ऑफिसची धावपळ... मुलांच्या शाळेची गडबड..... आणि त्यातच अचानक समजतं की शाळेत पोचवणा-या रिक्षावाल्या काकांचा संप आहे..... मग पुन्हा आणखी जास्त गडबड, धावपळ आणि मनःस्ताप..... नाशिकमध्ये महिनाभरात रिक्षाचालकांच्या संपाची ही तिसरी वेळ..... आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला....आरटीओच्या अधिकारी मारहाण आणि दमदाटी करत असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप आहे. आरटीओच्या कारवाईचा धसका घेऊन महिन्याभरापूर्वी एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तर चार दिवसांपूर्वी एजंटच्या मानसिक छळाला कंटाळून एकानं आत्महत्या केली.
आरटीओ आणि रिक्षाचालकांच्या भांडणात मधल्यामध्ये विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हाल होतात. रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागली तर काही विद्यार्थ्यांचीच शाळेला दांडी झाली.
आरटीओ अधिकारी आणि रिक्षाचालक यांच्यामधला हा संघर्ष येत्या काळात सुरूच राहणार, अशी चिन्हं आहेत. फक्त रिक्षाचालकांनी संपाची आधी कल्पना दिली तर विद्यार्थी आणि पालकांना योग्य नियोजन करणं शक्य होईल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, July 29, 2013, 22:10