Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.
कायम दुष्काळी भाग म्हणून सिन्नर तालुका ओळखला जातो. यंदा मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. तरीही सिन्नर तालुक्यात ४५ टँकर्स सुरु असल्याचं समोर आलं. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर या टँकर्सचं गौडबंगाल शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. मुळात गावातल्या विहीरी भरल्यायत, तरीही टँकरच्या खेपा कागदोपत्री सुरूच आहेत. वाड्या वस्त्यांना रोज एक खेप पाणीपुरवठा कागदोपत्री सुरू असला, तरी प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनी टँकर येत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. त्याचबरोबर वाडी-वस्तीच्या लोकसंख्येचा आकडाही फुगवण्यात आलाय. तर काही ठिकाणी टँकरचं पाणी चक्क हॉटेल व्यवसायिकांना विकलं जात असल्याचं समोर आलंय. हा सगळा टँकर घोटाळा उघड झाल्यावर जिल्हा प्रशासनानं सिन्नरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपभियंत्यांना करणे दाखवा नोटीस का पाठवू नये, तसंच निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे का सादर करू नये, अशी विचारणा केलीय.
पंचायत समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं जातं. या पंचायत समितीचे सभापतीच या गैरकारभाराला पाठीशी घालतायत. झी मिडीयानं याआधी सिन्नर तालुक्यातल्या रोजगार हमी योजनेच्या कामातल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता दुसरा टँकर घोटाळा समोर आल्यानं याबाबत तहसीलदार काय बाजू मांडतात आणि जिल्हा प्रशासन काय कारवाई करतं, याकडे लक्ष लागलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 7, 2013, 20:58