Last Updated: Sunday, May 19, 2013, 23:21
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकस्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्याची टीका शिवसेनेनं केलीय.
शहराच्या मध्यवस्तीत असूनही तितकाच दुर्लक्षित राहिलेला वाडा.. शंभरी ओलांडलेली ही वस्तू अभिनव भारत मंदिर म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांची खलबतं याच ठिकाणी चालायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमंडळाची स्थापना याच वास्तूमध्ये केली होती. तात्यारावांच्या जन्म आणि कर्मभूमीतच त्यांच्या जाज्वल्य कार्याचा साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराची दुरवस्था झालीय. या वास्तूत वाचनालय सुरु करण्यात आलं. मात्र सावरकरांना भेट दिलेली अनेक पुस्तकं, तात्यारावांची दुर्मिळ हस्तलिखितं जीर्ण अवस्थेत शेवटची घटका मोजतायेत. पावसाळ्यात छत गळत असल्यानं भिंतीना ओल येते. परिणामी वाचनालयात लावण्यात आलेली चित्रं, फोटोफ्रेम, पुस्तकं खराब होतायत. या अमुल्य दुर्मिळ ठेव्याचं जतन करण्यासाठी महापौरांनी यंदाच्या अंदाजपत्रकात ५० लाख रुपयांची तरतूद केलीय.
सावरकर कोण होते हे नव्या पिढीला समजेल असा हेतू वाचनालय सुरु करण्यामागे होता. मात्र सध्या वास्तूकडे कुणीच फिरकत नाही. सुरवातीला नाशिक दर्शनची बस पर्यटकांना अभिनव भारत मंदिर दाखवण्यासाठी घेऊन यायची मात्र आता ती संकल्पनाही इतिहास जमा झालीय.
सावरकरांच्या इच्छेनुसार स्थापना करण्यात आलेलं विश्वस्त मंडळही या वास्तूचं जतन करण्यात अपयशी ठरलंय. त्यामुळे जेवढी जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि विश्वस्त मंडळाची आहे तेवढीच जबाबदारी सावरकर नाशिकचे भूमिपुत्र होते असं छाती फुगवून सांगणाऱ्या प्रत्येक नाशिककरांची आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 23:10