Last Updated: Saturday, February 11, 2012, 17:42
www.24taas.com, नाशिक साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.
मालट्रक येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जात असताना समोरुन येणारी इंडिका कार चुकीच्या बाजूने घुसताना मालट्रकवर धडकली. या अपघातात इंडिकाचा मशीन व बॉडीसह चक्काचूर होताना कारमधील तिघे जागीच ठार झाले. उदयपूर उच्च न्यायालयात वकील असलेले ऍड. हेमंत कुंदनसिंह सोनी (३४ , रा. छोटी ब्रम्हपुरी, उदयपूर, राजस्थान), मनोज सिताराम पाटीदार (३४, रा. मनावर. मध्यप्रदेश) आणि प्रकाश मदनलाल सोळंकी (२५, रा. कोहथीपुरा, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
अपघातात इंडिकाचा चक्काचूर झाल्याने गाडीतून मृतदेह बाहेर काढताना पोलिसांना प्रयत्न करावे लागले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांसह येवला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
First Published: Saturday, February 11, 2012, 17:42