Last Updated: Monday, August 12, 2013, 23:33
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
१९९० मध्ये सैन्यामधला कार्यकाळ संपवून तेरा सैनिक संरक्षण विभागाच्या खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये रुजू झाले. तेव्हापासून त्यांची परवड सुरू आहे. देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणा-या या सैनिकांच्या नशिबी समाधानकारक पगार मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलीय. सैन्यात असताना जो पगार मिळतो तोच पगार खडकी कॅन्टोन्मेंटमध्येही मिळावा एवढीच त्यांची अपेक्षा.... त्यासाठी १९९६ पासून त्यांचा लढा सुरू आहे. कोर्टानंही त्यांच्या बाजूनं निकाल दिलाय. पण अजून वाढीव पगार मिळाला नाही.... देशाची एवढी सेवा करून हक्काचा पगार मिळवण्यासाठी त्यांना खडतर संघर्ष करावा लागतोय, हेच का ते देशसेवेचं फळ, असा सवाल ते विचारतायत.
या सैनिकांची व्यथा घेऊन आम्ही खडकी कॅन्टोन्मेंट छावणीच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या सैनिकांवर अन्याय झाल्याचं त्यांनी मान्य केलं आणि लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलं.
देशभरातल्या सैनिकांची हीच व्यथा आहे. सैन्यातला कार्यकाळ संपल्यावर अनेक जण सुरक्षा रक्षकांचं काम करतात. तर काही जणांना कामच मिळत नाही. ज्यांना मिळतं त्यांना समाधानकारक पगारासाठी झगडावं लागतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 12, 2013, 23:33