Last Updated: Friday, October 12, 2012, 13:31
www.24taas.com, पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेनं, एव्हरेस्ट सर करत शहराची मान देशात उंचावणाऱ्या गिर्यारोहकांनाही आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं होतं. पण, घोषणेनंतर मदत तर सोडाच उलट महापालिकेच्या वर्धापन दिनाला केवळ सत्कार करण्याचं पत्र पाठवत एकप्रकारे या वीरांची थट्टाच केलीय.
पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेप्रमाणंच पिंपरीतल्या ‘सागरमाथा’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करत अतुलनीय कामगिरी बजावली. संस्थेचा प्रमुख रमेश गुळवेनं या मोहिमेचं धाडसी स्वप्न पाहिलं होतं. पण, मोहिमेदरम्यान रमेशचा दुर्दैवी अंत झाला. तरीही त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं ‘सागरमाथा’च्या वीरांनी एव्हरेस्ट सर केलंच. त्यांच्या या कामगिरीबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेनं रमेश गुळवेंच्या कुटुंबीयांना पाच लाख आणि संस्थेलाही आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. या गोष्टीला आता कित्येक महिने उलटून गेलेत. पण, महापालिकेला काही आपल्या आश्वासनाची आठवण झालेली नाही. ‘झी २४ तास’नं काही दिवसांपूर्वी याबाबत महापौरांना विचारणा केली असता आम्ही वीरांना मदत देण्याचं आश्वासन दिलं होत.
दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही यामुळे सागरमाथा संस्थेचे वीरांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त केलीयं. आधी दिलेलं आश्वासन न पाळता अजूनही महापौर आपल्याला मदतीचं आश्वासन देतायत, याचंच या संस्थेच्या कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटतंय. ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.
First Published: Friday, October 12, 2012, 13:31