अपघातांना आमंत्रण देणारा उड्डाणपूल - Marathi News 24taas.com

अपघातांना आमंत्रण देणारा उड्डाणपूल

www.24taas.com, पिंपरी- चिंचवड
 
'एकहाती सत्तेमुळे पिंपरीचा विकास करु शकलो', असं उदाहारण अजित पवार नेहमीच देतात. पण याच विकासकामांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. पिंपरीतल्या थेरगाव उड्डाणपुलाचं काम निकृष्ट तर झालंच आहे. पण हा पूल चक्क प्रवाश्यांच्या जीवावर बेतलाय.
 
पिंपरी चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे साभागृहाच्या जवळचा हा उड्डाण पूल... मुळात या सबवेचं उड्डाणपुलात रुपांतर झालं. त्यावेळी ६ कोटींचं असलेलं काम जवळपास २१ कोटींवर गेलं. या उड्डाणपुलावरचा प्रवास प्रचंड धोकादायक आहे. या पुलाचे कठडे अगदी तोकड्या उंचीचे आहेत. त्यामुळेच या पुलावर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला.त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलाय. पालिका कर्मचा-यांच्या या निष्काळजीपणामुळं त्यांच्यावर गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल आता करण्यात येतोय.
 
दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं याची पाहणी करू आणि मग सुरक्षेचे उपाय योजू, असं ठेवणीतलं उत्तर दिलंय. मुळात हा उड्डाण पूल धोकादायक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर उपाय योजना करण्यासाठी अपघातांची वाट पहायची का हाच खरा प्रश्न आहे.

First Published: Thursday, June 14, 2012, 20:31


comments powered by Disqus