पुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये - Marathi News 24taas.com

पुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये

www.24taas.com, पुणे
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
 
पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी राज्य सरकारकडून १० कोटी, पुणे महापालिकेकडून साडेसात कोटी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अडीच कोटी आणि आमदार-खासदारांच्या फंडातून १० कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केलीय. येत्या महिन्याभरात शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरूवात होईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पुणे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली.
 
दादांनी केली आबांची पाठराखण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना शनिवारी कानपिचक्या दिल्या होत्या. महाराष्ट्रातच वारंवार बॉम्बस्फोट का होतात? अशा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर. आऱ. पाटील यांना विचारला होता. राज्यात वारंवार होणारे बॉम्बस्फोट ही चिंतेची बाब असल्याचं सांगत गृहखात्याचा कारभार सुधारण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांच्या कारभाराबाबत नाराजीही व्यक्त केली होती. याबाबतच आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडलं असता त्यांनी मात्र आर. आर. पाटील यांची पाठराखण केली. शरद पवारांची नाराजी गृहमंत्र्यांवर नाही, तर गृहमंत्रालयावर असल्याचं स्पष्टीकरण यावेळी दादांनी दिलंय.
 
.

First Published: Sunday, August 5, 2012, 15:23


comments powered by Disqus